मुंबई प्रतिनिधी
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या एप्रिल महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण बदल्यांना राज्य सरकारकडून एक महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागात (PWD) मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले आहेत. विभागाने तब्बल ३२ कार्यकारी अभियंते आणि १९८ उपविभागीय अभियंत्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाचवेळी बदल्या होण्याची ही पहिलीच वेळ मानली जात आहे. या निर्णयामुळे विभागात मोठी खळबळ उडाली असून विविध महत्त्वाच्या प्रकल्पांच्या कामकाजावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई, ठाणे, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या प्रमुख विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अधिकारी बदलण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागातील या बदल्यांमागे प्रशासनातील कार्यक्षमता वाढविणे, प्रलंबित प्रकल्पांना गती देणे आणि विभागातील समतोल राखणे हा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
उत्तर मुंबई, अंधेरी विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन धात्रक यांची बदली ठाणे सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ येथे करण्यात आली आहे. त्यांच्या जागी विशेष प्रकल्प विभाग, आरे गोरेगाव येथील कार्यकारी अभियंता गुंजन दिघावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील एकात्मिक घटक विभागाचे कार्यकारी अभियंता भूषण फेगडे यांची बदली विशेष प्रकल्प विभाग, आरे गोरेगाव येथे करण्यात आली आहे. तर ठाणे क्रमांक २ चे कार्यकारी अभियंता सत्यनारायण कांबळे यांची नियुक्ती महाड येथे करण्यात आली आहे.
या बदल्यांमध्ये केवळ कार्यकारी अभियंत्यांचाच नव्हे तर उपविभागीय अभियंत्यांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश करण्यात आला आहे. विभागांतर्गत कार्यरत असलेल्या १७ अधिकाऱ्यांसह अमरावती प्रादेशिक विभागातील १८, छत्रपती संभाजीनगर विभागातील १५, कोकण-१ विभागातील २७, कोकण-२ विभागातील २२, नाशिक विभागातील २५, पुणे विभागातील ३५, संकल्पचित्र मंडळातील ११, पंतप्रधान ग्रामसडक योजना कार्यालयातील १३ आणि राष्ट्रीय महामार्ग विभागातील १३ उपविभागीय अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, मुंबईतील भायखळा येथील जे. जे. रुग्णालयात सुरू असलेल्या बहुमजली मल्टिस्पेशालिटी रुग्णालय प्रकल्पाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या बांधकाम आणि दुरुस्ती उपविभागात नियुक्ती मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये मोठी चुरस असल्याचे सांगितले जात आहे. उपविभागीय अभियंता रणजित शिंगाडे यांच्या बदलीनंतर ही जागा रिक्त झाली असली तरी अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. याशिवाय उत्तर उपविभाग, दादर आणि मध्य मुंबई उपविभाग या महत्त्वाच्या जागाही सध्या रिक्त ठेवण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागातील या व्यापक बदल्यांमुळे आगामी काळात विविध विकासकामांच्या गतीवर आणि प्रशासकीय समन्वयावर परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः मुंबई आणि ठाणे परिसरातील पायाभूत सुविधा प्रकल्प, रस्ते विकास, सरकारी इमारतींची कामे आणि आरोग्यविषयक प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर नव्याने नियुक्त अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.


