गोवा :
गोव्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या ठाण्यातील एका मराठी कुटुंबासोबत अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. दक्षिण गोव्यातील कोलवा परिसरातील एका नामांकित फोर स्टार हॉटेलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास हाऊसकीपिंग विभागातील कर्मचाऱ्याने ‘मास्टर की’चा वापर करून पर्यटकांच्या रुममध्ये विनापरवानगी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. सुदैवाने कुटुंबातील महिलेची वेळेत जाग आल्यामुळे संभाव्य अनर्थ टळला. या घटनेमुळे गोव्यातील हॉटेल सुरक्षेविषयी गंभीर प्रश्न निर्माण झाले असून स्थानिक पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ठाण्यातील प्राजक्ता शेट्टीगर या आपल्या पती आणि मुलासह पर्यटनासाठी गोव्यात गेल्या होत्या. कोलवा येथील ‘गोल्डन क्राऊन’ या फोर स्टार हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता. २४ मे २०२६ रोजी रात्री शेट्टीगर कुटुंब रुम क्रमांक १०३ मध्ये झोपले होते. रात्री साडेदहा वाजता कुटुंब झोपी गेल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात म्हणजेच रात्री ११ वाजण्याच्या सुमारास रुमच्या दाराजवळ संशयास्पद हालचाल सुरू असल्याची जाणीव प्राजक्ता शेट्टीगर यांना झाली.
प्रसंगावधान राखत त्यांनी तत्काळ दाराच्या दिशेने धाव घेतली असता, हाऊसकीपिंग विभागातील एक कर्मचारी मास्टर कीच्या सहाय्याने दरवाजा उघडून आत प्रवेश करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अचानक समोर आलेल्या कुटुंबीयांनी त्या कर्मचाऱ्याला जाब विचारला असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. विशेष म्हणजे त्याने आधी “डबल बेडची मागणी केली होती म्हणून आलो,” असे सांगितले; मात्र नंतर हाऊसकीपिंग मॅनेजरसमोर “एसी खराब असल्याची तक्रार आली होती, त्यामुळे दुरुस्तीसाठी आलो,” असा दावा केला. कर्मचाऱ्याच्या या परस्परविरोधी उत्तरांमुळे कुटुंबाचा संशय आणखी बळावला.
घटनेनंतर संतप्त शेट्टीगर कुटुंबाने तत्काळ हॉटेल व्यवस्थापनाला याची माहिती दिली. मात्र, हॉटेल प्रशासनाने या गंभीर प्रकाराची दखल घेण्यात पूर्णपणे असंवेदनशील भूमिका घेतल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. “आम्ही कोणताही कॉल केला नव्हता. ना एसीबाबत तक्रार केली, ना बेड बदलण्याची मागणी केली. तरीही मध्यरात्री एक कर्मचारी मास्टर की घेऊन आमच्या खोलीत शिरण्याचा प्रयत्न करतो, ही अत्यंत धक्कादायक बाब आहे,” असे प्राजक्ता शेट्टीगर यांनी सांगितले.
त्यांनी पुढे सांगितले की, “जर मला वेळेत जाग आली नसती, तर पुढे काय घडले असते, याची कल्पनाही करवत नाही. या प्रकारामुळे आम्ही पूर्णपणे हादरलो आहोत.”
या प्रकरणात स्थानिक गोवा पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत कुटुंबाला सहकार्य केले. मात्र, हॉटेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. “जनरल मॅनेजरला संपर्क साधला असता, ते शहराबाहेर असल्याचे सांगून त्यांनी फोन बंद केला. हाऊसकीपिंग मॅनेजरनेही केवळ संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची औपचारिक भाषा केली आणि ड्युटी संपताच निघून गेला,” असा दावा शेट्टीगर कुटुंबाने केला.
या घटनेमुळे गोव्यातील पर्यटन व्यवसाय आणि हॉटेल सुरक्षाव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषतः महिला पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे. “मास्टर कीसारखी संवेदनशील चावी रात्रीच्या वेळी हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यांकडे कशी असू शकते? कोणतीही पूर्वपरवानगी किंवा माहिती न देता थेट रुममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणे हे भयावह आहे,” असा सवाल प्राजक्ता शेट्टीगर यांनी उपस्थित केला आहे.
गोव्यासारख्या आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळी अशा घटना घडत असल्याने पर्यटकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून संबंधित कर्मचाऱ्याची चौकशी केली जात आहे. हॉटेल प्रशासनाच्या भूमिकेबाबतही पोलीस तपासात माहिती घेतली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.


