पारनेर प्रतिनिधी
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजन समाजाचे प्रेरणास्थान कांशीरामजी यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह व अवमानकारक पोस्ट केल्याच्या आरोपावरून पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे तीव्र तणाव निर्माण झाला आहे. या घटनेनंतर संतप्त भीमसैनिकांनी संबंधित डॉक्टरला जाब विचारत त्याच्या तोंडाला काळे फासले, गळ्यात चपलांचा हार घालत जाहीर निषेध व्यक्त केला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, संबंधित डॉक्टरविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाळवणी येथील एका नामांकित डॉक्टरने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजन चळवळीचे नेते कांशीरामजी यांच्याविषयी अत्यंत खालच्या पातळीवरील व समाजात तेढ निर्माण करणारी पोस्ट शेअर केल्याचा आरोप आहे. ही पोस्ट काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, भीमसैनिक आणि पुरोगामी संघटनांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली.
“महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही,” अशी भूमिका घेत आज (ता. २९) मोठ्या संख्येने भीमसैनिक आणि कार्यकर्ते भाळवणी येथे जमले. संबंधित डॉक्टरच्या दवाखान्यासमोर घोषणाबाजी करत त्यांनी निषेध आंदोलन केले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी डॉक्टरला बाहेर आणत त्याच्या तोंडाला काळे फासले आणि गळ्यात चपलांचा हार घालत संताप व्यक्त केला. काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, संबंधित डॉक्टरविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.
या घटनेनंतर सामाजिक वर्तुळातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सोशल मीडियावर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली महापुरुषांविषयी अवमानकारक भाषा वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
दरम्यान, पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून, संबंधित पोस्टची सत्यता, त्यामागील हेतू आणि कायदेशीर बाबींचा तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


