चंद्रपूर प्रतिनिधी
सावकारी कर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळे अत्यंत टोकाचा निर्णय घेत किडनी विकण्याची वेळ आलेल्या नागभीड तालुक्यातील मिंथुर येथील शेतकरी रोशन शिवदास कुळे यांच्या कुटुंबाला अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून कुळे कुटुंबाला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली असून, या मदतीमुळे गंभीर आर्थिक आणि मानसिक संकटाचा सामना करणाऱ्या कुटुंबाला काहीसा आधार मिळणार आहे.
या प्रकरणी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा आमदार सुधिर मनगुटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगितले जात आहे. रोशन कुळे यांच्या परिस्थितीची गंभीर दखल घेत त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून आर्थिक मदतीची मागणी केली होती.
रोशन कुळे हे अल्पभूधारक शेतकरी असून, शेतीसाठी घेतलेल्या कर्जामुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले होते. सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न झाल्याने त्यांच्या शेतजमिनी गहाण गेल्या होत्या. वाढत्या कर्जबाजारीपणामुळे आणि आर्थिक विवंचनेतून मार्ग न सापडल्याने त्यांनी अत्यंत धक्कादायक पाऊल उचलत किडनी विकल्याची बाब समोर आली होती. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
अत्यंत बिकट परिस्थितीत रोशन कुळे यांनी चंद्रपूर येथील आ. मुनगंटीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट घेत आपल्या कुटुंबाची व्यथा मांडली होती. त्यानंतर या प्रकरणाला मानवी दृष्टिकोनातून हाताळत आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळावी यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू केला. मुख्यमंत्री कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि संबंधित प्रशासकीय विभागांशी समन्वय साधत त्यांनी प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केल्याचे सूत्रांनी सांगितले.
या प्रयत्नांना अखेर यश आले असून मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे आर्थिक अडचणींमुळे होरपळणाऱ्या कुळे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाल्याची भावना स्थानिक स्तरावर व्यक्त होत आहे.
“आमच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी संवेदनशीलतेने मदतीचा हात दिला. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आम्हाला आधार मिळाला,” अशा भावना रोशन कुळे यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केल्या.
दरम्यान, येत्या १९ मे रोजी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते रोशन कुळे यांना पाच लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात सकारात्मक भूमिका घेत तातडीने मदत मंजूर केल्याबद्दल आ. मुनगंटीवार यांनी त्यांचे आभार मानले आहेत.


