मुंबई प्रतिनिधी
मुंबईकरांचे आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या श्री सिद्धिविनायक मंदिर यांच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारने मोठे पाऊल उचलले असून, तब्बल ५०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्याच्या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी पार पडले. पहिल्या टप्प्यात सुमारे ७८ कोटी रुपयांची विकासकामे हाती घेण्यात येणार असून, मंदिर परिसर अधिक सुरक्षित, आधुनिक आणि भाविकांसाठी सुविधायुक्त करण्यावर भर देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर, विश्वस्त मंडळाचे सदस्य, विविध मान्यवर तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. भूमिपूजनानंतर झालेल्या सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिद्धिविनायक मंदिर हे महाराष्ट्राच्या श्रद्धेचे केंद्र असल्याचे सांगत, मंदिराच्या विकासातून भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा संकल्प असल्याचे स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी मंदिराच्या विकासामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. वाढती भाविकसंख्या, सुरक्षा व्यवस्थेची गरज आणि मंदिर परिसरातील वाढती गर्दी लक्षात घेता आधुनिक सुविधांची आवश्यकता असल्याची मागणी मंदिर प्रशासनाने केली होती. त्यानंतर ५०० कोटी रुपयांच्या भव्य विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली.
“श्री सिद्धिविनायक मंदिर हे केवळ मुंबईचेच नव्हे, तर देशातील सर्वाधिक प्रसिद्ध आणि जागृत देवस्थानांपैकी एक आहे. देश-विदेशातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यामुळे मंदिर परिसर अधिक सुरक्षित, सुबक आणि सुविधायुक्त करणे ही काळाची गरज बनली आहे,” असे शिंदे यांनी नमूद केले.
सुमारे २२५ वर्षांचा इतिहास लाभलेल्या या मंदिराची स्थापना १८०१ मध्ये लक्ष्मण पाटील आणि देहूबाई पाटील या दाम्पत्याने केली होती. कालांतराने सिद्धिविनायक मंदिर हे देशातील प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक बनले. मंगळवार, संकष्टी चतुर्थी आणि विविध धार्मिक उत्सवांच्या काळात लाखो भाविक मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात. याच पार्श्वभूमीवर सुरक्षा, वाहतूक आणि सुविधा व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यासाठी हा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यात मंदिराचे प्रवेशद्वार अधिक आकर्षक आणि सुरक्षित करण्यात येणार आहे. मंदिराच्या आतील आणि बाहेरील भिंतींना नवीन दगडी बांधकाम करण्यात येणार असून, मंदिर परिसराचे सुशोभीकरणही केले जाणार आहे. तसेच भाविकांच्या वाहनांसाठी १२४ वाहन क्षमतेचे दुमजली पार्किंग उभारण्यात येणार आहे. याशिवाय अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, सीसीटीव्ही व्यवस्था, गर्दी नियंत्रण प्रणाली आणि भाविकांसाठी सुविधा केंद्र उभारण्याचाही आराखड्यात समावेश आहे.
महायुती सरकार धार्मिक आणि आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यास प्राधान्य देत असल्याचे सांगताना शिंदे यांनी पंढरपूर विकास आराखडा, भीमाशंकर मंदिर तसेच राज्यातील इतर प्राचीन देवस्थानांच्या विकास प्रकल्पांचा उल्लेख केला. राज्यातील ‘अ’ वर्गातील मंदिरांसाठी दिला जाणारा निधी दोन कोटींवरून पाच कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर आणि महाकालेश्वर मंदिर यांसारख्या धार्मिक स्थळांचा भव्य विकास करण्यात आल्याचे सांगत, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानांचेही रूपांतर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धिविनायक मंदिराचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून, भाविकांच्या श्रद्धेला धक्का न लावता परंपरा आणि आधुनिक सुविधा यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. आगामी काळात या प्रकल्पामुळे मंदिर परिसराला नवसंजीवनी मिळेल आणि देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि आनंददायी दर्शनाचा अनुभव मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


