मुंबई प्रतिनिधी
किरकोळ कारणावरून पती-पत्नीमध्ये झालेला वाद एका महिलेच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना वर्सोवा परिसरात उघडकीस आली आहे. पतीने पोटात लाथ मारल्याने ४२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी पतीविरुद्ध खुनाच्या उद्देशाशिवाय मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
रुक्साना शेख असे मृत महिलेचे नाव असून ती पती शहनुद्दीन आणि दोन मुलींसह वर्सोवा परिसरात राहत होती. रुक्सानाला लो बीपीचा त्रास होता. १८ मे रोजी पहाटे तिचे आणि पतीचे किरकोळ कारणावरून भांडण झाले. या वेळी शहनुद्दीनने तिच्या पोटात लाथ मारल्याचा आरोप आहे. त्यानंतर रुक्सानाला तीव्र पोटदुखी सुरू झाली.
रुक्सानाने तिची बहीण रिया हिला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर दुसरी बहीण झाराने तिला कूपर रुग्णालयात दाखल केले. तेथे एक्स-रे आणि सोनोग्राफी करण्यात आली. सुरुवातीला कोणतीही गंभीर दुखापत आढळून आली नाही. उपचारानंतर तिला घरी सोडण्यात आले. मात्र तिची प्रकृती सतत खालावत गेली.
पोटदुखी वाढत असल्याने कुटुंबीयांनी तिला अंधेरीतील सेव्हन बंगलो परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथेही तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर डॉक्टरांनी सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला. पुढील तपासणीत तिच्या शरीरात संसर्ग पसरल्याचे समोर आले. अखेर तिला पुन्हा कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली मात्र शस्त्रक्रियेनंतर तिला शुद्ध आली नाही. २० मे रोजी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
शवविच्छेदन अहवालात आतड्यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी २२ मे रोजी वर्सोवा पोलिसांनी शहनुद्दीनविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


