मुंबई प्रतिनिधी
सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावणे, झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती देणे आणि प्रशासनाच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला प्रभावी दिशा देणे या उल्लेखनीय कार्याची दखल घेत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA), बृहन्मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘सेवारत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
ITSF अवॉर्ड आणि ‘साई दिशा प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार सोहळ्यात डॉ. कल्याणकर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
प्रशासनातील कर्तव्यनिष्ठा, लोकाभिमुख दृष्टीकोन तसेच जनसामान्यांप्रती असलेली संवेदनशील बांधिलकी याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. झोपडपट्टी पुनर्वसन प्रक्रियेत पारदर्शकता, गती आणि नागरिकाभिमुख निर्णयप्रक्रिया राबविण्यात डॉ. कल्याणकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.
पुरस्कार स्वीकारताना डॉ. कल्याणकर यांनी हा सन्मान प्रशासनातील संपूर्ण टीमच्या कार्याची पावती असल्याची भावना व्यक्त केली.


