सातारा प्रतिनिधी
सातारा, दि. १७ : कोयना बॅकवॉटर फेस्टिव्हलचे आयोजन २४ डिसेंबर २०२६ ते २ जानेवारी २०२७ या कालावधीत करण्यात येणार आहे. या फेस्टिव्हलसाठी विविध विभागांनी आवश्यक त्या परवानग्या वेळेत द्याव्यात. सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून हा फेस्टिव्हल यशस्वी करावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत पालकमंत्री देसाई बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कोयना बॅकवॉटर फेस्टिव्हलच्या कालावधीत महाबळेश्वर, तापोळा यासह अन्य पर्यटनस्थळांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. फेस्टिव्हलसाठी सर्वसमावेशक आणि आकर्षक आराखडा तयार करावा. या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, याची विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना देसाई यांनी केल्या.
फेस्टिव्हलची राज्याबरोबरच परराज्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी करण्यात यावी. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन कंपन्यांशी संपर्क साधावा. तसेच परदेशी पर्यटकांनाही या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होता येईल, यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
ग्रामीण रुग्णालयाच्या कामाला गती द्या
पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध असून कामाला गती द्यावी, असे निर्देशही पालकमंत्री देसाई यांनी दिले. रुग्णालयासाठी अतिरिक्त जमीन आवश्यक असून भूसंपादनासाठी आरोग्यमंत्र्यांकडून निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे संबंधित जमीनमालकांशी चर्चा करून जमीन तातडीने ताब्यात घेण्याची कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जीवा महाले स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही
किल्ले प्रतापगड परिसरातच जीवा महाले यांचे स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
स्मारकाच्या उभारणीसाठी समिती गठीत करण्यात आली असून त्यामध्ये वाईचे प्रांताधिकारी यांचाही समावेश करण्यात आला आहे. प्रांताधिकाऱ्यांनी स्मारकाच्या कामाचा वेळोवेळी आढावा घ्यावा, अशा सूचना देसाई यांनी केल्या.
समितीच्या सदस्यांनी सांस्कृतिक विभागाकडील जीवा महाले यांची उपलब्ध छायाचित्रे पाहून अंतिम छायाचित्र निश्चित करावे. त्यानुसार पूर्णाकृती पुतळ्याच्या निर्मितीसाठी मंजुरी घेऊन अनुभवी शिल्पकाराकडून पुतळा तयार करून उभारण्यात येईल, असेही पालकमंत्री देसाई यांनी सांगितले.
विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना लाभांचे वाटप
बैठकीपूर्वी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांना विविध लाभ आणि प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

