मुंबई प्रतिनिधी
मुंबई : पावसाळ्यातील उपाययोजनांप्रमाणेच आगामी काळात वायू प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी नियोजन करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. वायू प्रदूषण वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या मोठ्या प्रकल्पांवर विशेष लक्ष ठेवून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभाग, खाते, प्रकल्प आणि उपक्रमांचा मासिक आढावा घेण्यासाठी शुक्रवारी (१८ सप्टेंबर) महानगरपालिका मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीत आयुक्त भिडे यांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या.
सध्या मुंबईतील वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) नियंत्रणात असला तरी आगामी काळात त्यात वाढ होऊ नये, यासाठी वेळीच उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. महानगरपालिकेने जारी केलेल्या २८ मुद्द्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करावे. तसेच १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान विशेष अभियान राबवून रस्ते धुणे, मोठ्या प्रकल्पांच्या ठिकाणी आवरण लावणे यासह आवश्यक उपाययोजना पूर्ण कराव्यात, असे त्यांनी सांगितले.
‘पादचारी प्रथम’ अभियानाला सातत्याची गरज
महानगरपालिकेच्या ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत सुमारे ३०७ किलोमीटर लांबीचे २०० पदपथ निवडण्यात आले आहेत. या पदपथांवरील अडथळे दूर करून ते पादचाऱ्यांसाठी सुलभ करण्याचे काम सुरू आहे. विविध विभागांमध्ये झालेल्या कार्यवाहीचे दृश्य परिणाम दिसत असून, या अभियानात सातत्य ठेवून ते अधिक व्यापक आणि प्रभावी करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करा
नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारी या महानगरपालिकेच्या कामकाजाचे वास्तव मूल्यमापन करणाऱ्या असतात. त्यामुळे तक्रारी गांभीर्याने घेऊन त्यांचे वेळेत आणि योग्य पद्धतीने निराकरण करावे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
‘मार्ग’ (मॅनेजमेंट अँड रिड्रेसल ऑफ ग्रीव्हन्स) प्रणालीवर आतापर्यंत ८७ हजार ४ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी सुमारे ६४ टक्के तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. तक्रारी ज्या स्तरावर सोडवणे अपेक्षित आहे, त्याच स्तरावर त्यांचे निराकरण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
१३९ वाहतूक कोंडीच्या ठिकाणांचा अभ्यास
मुंबईतील वाहतुकीस अडथळा ठरणारी सुमारे १३९ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या ठिकाणांचा सखोल अभ्यास करून वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. आवश्यकतेनुसार अडथळा ठरणारी बांधकामे नियमानुसार निष्कासित करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले.
रस्ते, पूल, मलनिस्सारण, पर्जन्य जलवाहिन्या आदी विविध प्रकल्पांच्या प्रगतीवर संबंधित परिमंडळांच्या उपआयुक्तांनी लक्ष ठेवावे. प्रकल्प विहित वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पबाधित व्यक्तींची (पीएपी) यादी संबंधित विभागांनी वेळेत सादर करावी, जेणेकरून प्रकल्पांच्या कामात विलंब होणार नाही, असेही अश्विनी भिडे यांनी सांगितले.
बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्यासह सहआयुक्त, उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त, विभागप्रमुख, खातेप्रमुख आणि संचालक उपस्थित होते.

