सातारा प्रतिनिधी
सातारा : घरभाड्याचा खर्च परवडत नसल्याचे कारण देत ६५ वर्षीय आईला आधाराविना सोडल्याच्या प्रकरणाची सातारा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. रुक्मिणी सदाशिव भस्मे या वृद्ध महिलेच्या पालनपोषणाची जबाबदारी पार न पाडल्याप्रकरणी त्यांच्या दोन्ही मुलांना साताऱ्याचे प्रांताधिकारी आशिष बारकूल यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आईला दरमहा निर्वाह भत्ता का देऊ नये, याबाबत लेखी स्पष्टीकरण साद करण्याचे निर्देश मुलांना देण्यात आले आहेत.
रुक्मिणी भस्मे या पाटण तालुक्यातील मुरूड येथील रहिवासी आहेत. पतीच्या निधनानंतर त्या मुलांच्या आधारावर राहत होत्या. काही काळ त्या मुलांसोबत सातारा शहरातील भाड्याच्या घरात राहत होत्या. मात्र, घरभाड्याचा खर्च वाढत असल्याने त्यांना घरात ठेवणे शक्य नसल्याचे कारण मुलांकडून सांगण्यात आल्याची माहिती समोर आली.
त्यानंतर रुक्मिणी भस्मे यांना घराबाहेर पडावे लागले. काही काळ त्यांनी साताऱ्यातील मंदिरात आश्रय घेतला. वृद्ध आईची अशी अवस्था झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर नागरिकांकडून मदतीसाठी पुढाकार घेण्यात आला. प्रशासनानेही प्रकरणाची दखल घेत त्यांच्यासाठी वाई तालुक्यातील वेळे येथील यशोधन ट्रस्टमध्ये निवाऱ्याची व्यवस्था केली.
यशोधन ट्रस्टचे संस्थापक रवींद्र बोडके यांनी रुक्मिणी भस्मे यांच्या देखभालीसाठी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, वृद्ध महिलेला केवळ निवारा देणे पुरेसे नसून तिच्या पालनपोषणाची जबाबदारी मुलांनीही स्वीकारणे आवश्यक असल्याने प्रशासनाने कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
प्रांताधिकाऱ्यांनी बजावलेल्या नोटीसमध्ये दोन्ही मुलांना न्यायाधिकरणासमोर व्यक्तिशः उपस्थित राहून आपले म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे. आईच्या निर्वाहासाठी दरमहा भत्ता मंजूर करण्याबाबत त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. निर्धारित वेळी समाधानकारक उत्तर न दिल्यास प्रकरणात एकतर्फी निर्णय घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाऊ शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, रुक्मिणी भस्मे यांच्या एका मुलाला नोटीस मिळाल्याची माहिती आहे. तर दुसरा मुलगा सध्या कुठे आहे, याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नसल्याचे यशोधन ट्रस्टकडून सांगण्यात आले. संबंधित मुलांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून यापूर्वीही प्रयत्न करण्यात आले होते.
विशेष म्हणजे, मुलांकडून दुर्लक्ष झाल्याची परिस्थिती निर्माण होऊनही रुक्मिणी भस्मे यांनी मुलांविषयी कटुता व्यक्त केली नसल्याचे समोर आले आहे. आपल्याला मुलांसोबत राहायचे असल्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.
या प्रकरणामुळे वृद्ध आई-वडिलांच्या पालनपोषणाची जबाबदारी आणि त्यासाठी उपलब्ध असलेल्या कायदेशीर तरतुदींचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. प्रशासनाच्या नोटीसीनंतर दोन्ही मुलांकडून काय स्पष्टीकरण दिले जाते आणि न्यायाधिकरणाकडून पुढे काय निर्णय घेतला जातो, याकडे आता लक्ष लागले आहे.

