मुंबई प्रतिनिधी
वांद्रे पूर्वेतील गरीब नगर परिसरातील रेल्वे अतिक्रमण हटाव मोहिमेच्या तिसऱ्या दिवशीही गुरुवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू राहिली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या या मोहिमेदरम्यान बुधवारी सायंकाळी संतप्त स्थानिकांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करत १६ जणांना अटक केली आहे.
रेल्वे प्रशासनाकडून गरीब नगरमधील अनधिकृत झोपड्यांवर सलग तिसऱ्या दिवशी बुलडोझर चालवण्यात आले. बुधवारी झालेल्या दगडफेकीनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून मुंबई पोलीस, रेल्वे सुरक्षा बल (RPF), जीआरपी तसेच रॅपिड अॅक्शन फोर्सच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
दगडफेक प्रकरणी पोलिसांनी १०९ कलमान्वये हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून सुमारे १०० ते १५० जणांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. एफआयआरमध्ये १० जणांची नावे नमूद करण्यात आली असून आतापर्यंत १६ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घटनेत पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याचे सुमारे ८५ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. उर्वरित कारवाई सुरळीत पार पडावी यासाठी अतिरिक्त यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. सुमारे १२०० सुरक्षा रक्षक या मोहिमेत सहभागी आहेत.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभावित रहिवाशांना रेल्वेकडून पाणी व अन्नाची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच या कारवाईमुळे वांद्रे टर्मिनसच्या विस्तारासाठी जागा उपलब्ध होणार असून पाचवी आणि सहावी रेल्वेमार्गिका टाकण्याचा मार्ग मोकळा होईल. परिणामी उपनगरीय तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांची संख्या वाढण्यास मदत होणार असून वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


