मुंबई प्रतिनिधी
देशातील बेरोजगार तरुणांची तुलना ‘कॉकरोच’शी करण्यात आल्याचा आरोप सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका कथित विधानावरून देशभरात मोठा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर उदयास आलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ या मोहिमेच्या अधिकृत ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) खात्यावर भारतात बंदी घालण्यात आल्याने नव्या राजकीय आणि सामाजिक चर्चेला तोंड फुटले आहे.
कॉकरोच जनता पार्टी का X/ट्विटर अकाउंट भारत में प्रतिबंधित कर दिया गया है। pic.twitter.com/Ppqs57duxS
— ᗰᖇ. ᗩᖇISᑌ (@Arisu786) May 21, 2026
गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. बेरोजगार तरुणांचा अपमान झाल्याची भावना व्यक्त करत अनेकांनी सोशल मीडियावर सरकार आणि न्यायव्यवस्थेविरोधात संताप नोंदवला. त्यानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’ या नावाने सोशल मीडियावर मोहीम सुरू करण्यात आली. अल्पावधीतच या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला आणि युवकांमध्ये ती वेगाने लोकप्रिय झाली.
विशेष म्हणजे, या मोहिमेच्या इंस्टाग्राम पेजला अवघ्या काही दिवसांत एक कोटीहून अधिक फॉलोअर्स मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. तुलनेत भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर सुमारे ८७ लाख फॉलोअर्स असल्याचे सांगितले जात आहे. गुरुवारी सकाळी या फॉलोअर्सच्या आकड्यांची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली होती.
मात्र, याचदरम्यान ‘कॉकरोच जनता पार्टी’चे अधिकृत ‘एक्स’ खाते भारतात उपलब्ध नसल्याचे दिसून आले. खाते उघडण्याचा प्रयत्न केल्यास “हे खाते भारतात रोखण्यात आले आहे” असा संदेश अनेक वापरकर्त्यांना दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सरकारी दबाव आणि डिजिटल सेन्सॉरशिप यावरून नव्याने वाद निर्माण झाला आहे.
या खात्याचे संचालन करणारे अभिजीत दीपके यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करून संताप व्यक्त केला. “ज्याची भीती होती तेच घडले. आधी आमचे अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न झाला. तो अयशस्वी ठरल्यानंतर आमचे एक्स अकाउंटच भारतात बंद करण्यात आले,” असा आरोप त्यांनी केला.
दीपके यांनी पुढे म्हटले की, “आम्ही फक्त सरकारकडून उत्तरदायित्वाची मागणी करत होतो. कोणताही चुकीचा किंवा बेकायदेशीर मजकूर आम्ही पोस्ट केला नव्हता. तरीही आमचे खाते बंद करण्यात आले. ही कसली लोकशाही आहे?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
त्यांनी युवकांना या कारवाईविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन करत, “जर एखादे सोशल मीडिया खाते केवळ प्रश्न विचारल्यामुळे बंद केले जात असेल, तर हा लोकशाहीसाठी धोक्याचा इशारा आहे,” असेही म्हटले.
दरम्यान, या प्रकरणावर अद्याप केंद्र सरकार, ‘एक्स’ कंपनी किंवा संबंधित अधिकृत यंत्रणांकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे खाते नेमके कोणत्या कारणामुळे रोखण्यात आले, याबाबत संभ्रम कायम आहे.
सोशल मीडियावर मात्र या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असून, एका बाजूला ‘कॉकरोच जनता पार्टी’ला पाठिंबा देणारे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत, तर दुसरीकडे काही जणांनी या मोहिमेवर टीकाही केली आहे. आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


