मुंबई प्रतिनिधी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील १७ विधान परिषद जागांच्या निवडणुकीची घोषणा होताच महायुतीत जागावाटपावरून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात अंतर्गत चर्चांना वेग आला असून, अनेक जागांवर मित्रपक्षांमध्येच दावे-प्रतिदावे रंगू लागले आहेत. विशेषतः कोकणातील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांवरून महायुतीत मोठी चुरस निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महायुतीच्या समन्वय समितीपुढे सध्या प्राथमिक जागावाटपाचा फॉर्म्युला ठेवण्यात आला असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यमान सदस्यसंख्या आणि पक्षनिहाय ताकद या आधारे जागा वाटपाचे गणित मांडले जात आहे. त्यानुसार भाजपने सर्वाधिक १२ जागांवर दावा केला असून शिवसेनेला ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला २ जागा देण्याचा प्राथमिक प्रस्ताव चर्चेत असल्याचे समजते.
महायुतीत भाजपचा वरचष्मा
राज्यातील बहुतांश महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपालिकांमध्ये भाजपचे सदस्यसंख्याबळ तुलनेने जास्त असल्याने पक्षाने मोठा वाटा मागितला आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीतही भाजपची भूमिका निर्णायक राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. दुसरीकडे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या प्रभावक्षेत्रातील जागांवर ठाम दावा केल्याने काही मतदारसंघांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महायुतीतील वरिष्ठ नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनौपचारिक चर्चा सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आठवड्याभरात अंतिम निर्णयाची शक्यता
महायुतीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील आठवडाभरात जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला निश्चित केला जाऊ शकतो. काही मतदारसंघांमध्ये ‘अदलाबदल’ करण्याचाही पर्याय चर्चेत आहे. ज्या ठिकाणी एका पक्षाकडे स्थानिक स्तरावर अधिक ताकद आहे, त्या ठिकाणी संबंधित पक्षाला उमेदवारी देण्याचा विचार सुरू असल्याचे समजते.
विशेषतः कोकणातील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार दावा केला आहे. तर पुणे मतदारसंघावर भाजप आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय ठाणे, नाशिक आणि यवतमाळ या जागांवर शिवसेनेने आपला दावा कायम ठेवला आहे.
प्राथमिक चर्चेनुसार जागावाटपाचा फॉर्म्युला
भाजप & १२ जागा
शिवसेना – ३ जागा
राष्ट्रवादी काँग्रेस – २ जागा
कोणत्या जागेवर कोणत्या पक्षाचा दावा?
राष्ट्रवादी काँग्रेस
रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
हिंगोली – परभणी
शिवसेना
ठाणे
नाशिक
यवतमाळ
भाजप
नागपूर
वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली
अहिल्यानगर
छत्रपती संभाजीनगर – जालना
सातारा – सांगली
पुणे
जळगाव
नांदेड
भंडारा – गोंदिया
अमरावती
लातूर – धाराशीव – बीड
सोलापूर
मित्रपक्षांची नाराजी वाढण्याची शक्यता
महायुतीतील मित्रपक्षांना अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळण्याची शक्यता असल्याने आगामी काळात नाराजी उफाळून येण्याचीही शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही अतिरिक्त जागांसाठी दबाव वाढवला जाऊ शकतो. मात्र भाजपकडून ‘संख्याबळाच्या आधारेच निर्णय’ घेतला जाईल, अशी भूमिका मांडली जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत समीकरणे आणि जागावाटपातील तडजोडी याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आगामी काही दिवसांत होणाऱ्या बैठका आणि चर्चांनंतरच महायुतीचा अंतिम फॉर्म्युला स्पष्ट होणार आहे.


