मुंबई प्रतिनिधी
पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरवाढीची थेट झळ आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचली आहे. मुंबई, उपनगरे आणि एमएमआरडीए क्षेत्रात भाज्यांचे दर अक्षरशः भडकले असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत किरकोळ बाजारात २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा शाकाहार दिवसेंदिवस महाग होत चालला असून गृहिणींचे किचन बजेट कोलमडून पडले आहे.
काही दिवसांपूर्वी ४० रुपये किलो दराने मिळणारा टोमॅटो आता थेट ६० रुपयांवर पोहोचला आहे. फरसबीचे दर तब्बल १८० ते २०० रुपये किलोवर गेले असून वाटाण्यानेही शंभरी पार केली आहे. एवढेच नव्हे तर एका लिंबूसाठी तब्बल १० रुपये मोजावे लागत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कोथिंबिरीची एक जुडी ४० रुपयांना विकली जात असून वांग्याचे दर ८० रुपये किलोवर गेले आहेत.
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक होते. मात्र इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढल्याने त्याचा थेट परिणाम भाज्यांच्या दरावर होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला भाज्यांचे दर स्थिर होते. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, मीरा रोड आणि भाईंदर परिसरात भाज्या १० ते २० रुपये पाव किलो दराने सहज उपलब्ध होत होत्या. मात्र गेल्या काही दिवसांतील इंधन दरवाढीनंतर जवळपास सर्व भाज्यांचे दर ३० रुपये पाव किलोच्या पुढे गेले आहेत.
मुंबईतील विविध भागांमध्ये भाज्यांचे दर वेगवेगळे दिसून येत आहेत. लालबाग, काळाचौकी, दादर आणि कुर्ला परिसरात ३० रुपये पाव किलो दराने मिळणाऱ्या भाज्या अंधेरी, गोरेगाव आणि कफ परेड परिसरात ५० रुपये पाव किलो दराने विकल्या जात आहेत. त्यामुळे उपनगरातील नागरिकांना अधिक आर्थिक फटका बसत आहे.
दरम्यान, उष्णतेमुळे भाज्यांची आवक घटल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. व्यापाऱ्यांच्या मते, बाजारात येणाऱ्या मालापैकी निम्म्याहून अधिक भाजीपाला खराब होत आहे. त्यामुळे उपलब्धतेवर परिणाम होत असून दर वाढ कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
थेट पणन योजनेवरही व्यापाऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. स्वस्त भाजीपाला मिळावा यासाठी सरकारने एपीएमसीचे निर्बंध हटवून शेतकऱ्यांना थेट विक्रीची मुभा दिली होती. मात्र या व्यवस्थेत दलालांनी घुसखोरी केल्याचा आरोप होत आहे. परिणामी एपीएमसी आणि किरकोळ बाजारातील दरांमध्ये कोणताही ताळमेळ राहिलेला नसल्याचे भाजीपाला व्यापारी शंकर फडतरे यांनी सांगितले.
“डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला आहे. उष्णतेमुळे भाजीपाल्याची आवकही कमी झाली आहे. बाजारात येणाऱ्या मालाचा मोठा हिस्सा खराब होतो. पाऊस पडत नाही तोपर्यंत भाज्यांचे दर चढेच राहतील,” अशी प्रतिक्रिया भाजी विक्रेते सूर्यकांत कंदरपळे यांनी दिली.
भाज्यांचे सध्याचे दर (प्रति किलो/जुडी)



