मुंबई प्रतिनिधी
भांडुप परिसरातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका आशा कोपरकर आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात अपहरण, मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पतीचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून हा प्रकार घडल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते सुरेश कोपरकर यांचे एका महिलेसोबत संबंध असल्याचा संशय नगरसेविका आशा कोपरकर आणि त्यांच्या कुटुंबीयांना होता. या संशयातून संबंधित महिलेला जबरदस्तीने वाहनात बसवून नेण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर तिला एका ठिकाणी नेऊन मारहाण करण्यात आली. तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचाही आरोप पीडित महिलेने केला आहे.
या प्रकरणी आशा कोपरकर, त्यांच्या दोन मुली, जावई, मुलगा आणि खासगी वाहन चालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आशा कोपरकर या भांडुप प्रभाग क्रमांक ११० मधील काँग्रेसच्या नगरसेविका असून त्या काँग्रेस नेते सुरेश कोपरकर यांच्या पत्नी आहेत.
घटनेनंतर पीडित महिलेनं थेट भांडुप पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत अपहरण, मारहाण, धमकी आदी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
दरम्यान, या घटनेमुळे भांडुप परिसरात मोठी चर्चा रंगली असून स्थानिक राजकीय वर्तुळातही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल तपशील आणि अन्य पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.


