लातूर प्रतिनिधी
देशभरात गाजत असलेल्या NEET (UG)-2026 पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) महाराष्ट्रात मोठी कारवाई करत लातूरमधील एका निवृत्त प्राध्यापकाला ताब्यात घेतल्याने शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित प्राध्यापक हे नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनलशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, “ज्याने पेपर सेट केला, त्यानेच तो फोडला का?” असा गंभीर सवाल आता उपस्थित होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध राज्यांमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणी चौकशी आणि धाडी सुरू असताना महाराष्ट्रातील नाशिकनंतर लातूरमध्ये झालेली ही दुसरी मोठी कारवाई मानली जात आहे. सीबीआयच्या विशेष पथकाने गुरुवारी सकाळी संबंधित प्राध्यापकाला ताब्यात घेत चौकशी सुरू केली. या संपूर्ण कारवाईदरम्यान तपास यंत्रणांनी कमालीची गोपनीयता पाळल्याचे सांगितले जात आहे.
रसायनशास्त्राचे प्राध्यापक; प्रश्नपत्रिका निर्मितीशी संबंध?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेले प्राध्यापक लातूरमधील एका नामांकित महाविद्यालयातून तीन ते चार वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते. ते रसायनशास्त्र विषयाचे ज्येष्ठ प्राध्यापक असून गेल्या काही वर्षांपासून NEET परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होते, अशी माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे.
या प्राध्यापकांकडे मागील दोन ते तीन वर्षांपासून पेपर सेटिंगची जबाबदारी होती, अशीही माहिती समोर येत आहे. त्यामुळे यापूर्वीच्या परीक्षांमध्येही कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार झाला होता का, याचाही तपास सीबीआयकडून केला जात आहे. या चौकशीमुळे राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
खासगी क्लासेसवरही संशयाची सुई
या प्रकरणात लातूरमधील एका खासगी कोचिंग क्लासेसचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत कारवाई करत संबंधित संस्थेतील सीसीटीव्ही हार्ड डिस्क जप्त केली. क्लासेसमधील तीन ते चार जणांची कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोणत्या क्लासेसविरोधात तक्रार करण्यात आली आहे, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी, शैक्षणिक वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. कथित पेपरफुटी रॅकेटशी या क्लासेसचा काही संबंध आहे का, याचा तपास पोलीस आणि सीबीआय संयुक्तपणे करीत आहेत.
पोलिस प्रशासन सतर्क; माहिती देण्याचे आवाहन
या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांना तातडीने सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिस प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, NEET (UG)-2026 पेपरफुटी संदर्भात कोणाकडेही महत्त्वाची माहिती, दस्तऐवज किंवा पुरावे असल्यास त्यांनी थेट पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन अधिकृत प्रेस नोटद्वारे करण्यात आले आहे.
“आमच्या वर्षभराच्या मेहनतीचे काय?”; विद्यार्थी-पालकांमध्ये संताप
नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर राज्यातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूरमध्ये विद्यार्थ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. हजारो विद्यार्थी वर्षभर कठोर परिश्रम करून NEET ची तयारी करतात. मात्र पेपरफुटीच्या आरोपांमुळे परीक्षा प्रक्रियेवरील विश्वासच डळमळीत झाल्याची भावना विद्यार्थी आणि पालक व्यक्त करीत आहेत.
“आमच्या वर्षभराच्या मेहनतीचे काय?”, “प्रामाणिक विद्यार्थ्यांना शिक्षा का?” असे सवाल आता पालकांकडून उपस्थित केले जात आहेत. अनेक कोचिंग क्लासेससमोर विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाचे वातावरण असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
राष्ट्रीय परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या NEET परीक्षेच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पेपर तयार करणाऱ्या यंत्रणेतूनच माहिती बाहेर गेल्याचा संशय व्यक्त होत असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. आगामी काळात सीबीआयच्या तपासातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


