मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले असून, राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. येत्या १६ जूनपासून या परीक्षांना प्रारंभ होणार असून, जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत परीक्षा चालणार आहेत. मुख्य परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या तसेच गुणसुधारणा करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या माध्यमातून पुन्हा एक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, बारावीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून सुरू होऊन ३ जुलैपर्यंत चालतील. तर विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखांच्या बारावीच्या परीक्षा देखील १६ जूनपासून सुरू होऊन ८ जुलैपर्यंत पार पडतील. दहावीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून सुरू होऊन ३० जूनपर्यंत घेण्यात येणार आहेत.
सर्व परीक्षा दोन सत्रांमध्ये होणार असून, सकाळचे सत्र ११ ते २ आणि दुपारचे सत्र ३ ते ६ या वेळेत पेपर घेतले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत ऑनलाइन अर्ज भरावे लागणार असून, अर्ज प्रक्रियेला १२ मेपासून सुरुवात झाली आहे.
निकालानंतर विद्यार्थ्यांमध्ये तणाव
फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या मुख्य परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. अनेक विद्यार्थ्यांना अपेक्षित गुण मिळाले नसल्याने किंवा काही विषयांत अपयश आल्याने पुरवणी परीक्षेकडे आशेने पाहिले जात आहे. विशेषतः स्पर्धा परीक्षा, प्रवेशप्रक्रिया आणि करिअरच्या दृष्टीने एका वर्षाचे नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू आहे.
दरम्यान, ‘नीट’ परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. “पुन्हा परीक्षा पेपर फुटला तर जबाबदार कोण?” असा थेट सवाल विद्यार्थ्यांकडून राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) कडे केला जात आहे. सुट्ट्यांचे नियोजन रद्द करून अनेक विद्यार्थी पुन्हा अभ्यासाला लागल्याने मानसिक तणाव वाढल्याचे चित्र आहे.
मराठी विषयाच्या निकालाने चिंता वाढली
राज्यात मराठी भाषेच्या वापराचा आग्रह वाढत असतानाच दहावीच्या निकालात मराठी विषयातील कामगिरीने शिक्षणतज्ज्ञांची चिंता वाढवली आहे. पहिली भाषा म्हणून मराठी घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्तीर्णतेचा टक्का यंदा ९२.५७ एवढाच राहिला आहे.
राज्यातील १६ लाख १५ हजार विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी तब्बल १० लाख ८७ हजार विद्यार्थ्यांनी मराठी पहिली भाषा म्हणून निवडली होती. मात्र, त्यातील सुमारे १० लाख ६ हजार विद्यार्थीच उत्तीर्ण झाले. म्हणजेच ८० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मराठी विषयात अपयशाचा सामना करावा लागला.
यामध्ये नागपूर विभागाची स्थिती सर्वाधिक चिंताजनक मानली जात आहे. नागपूर विभागात मराठी विषयाचा निकाल केवळ ८८.७४ टक्के लागला. दुसरीकडे कोकण, कोल्हापूर आणि पुणे विभागांनी मात्र मराठी विषयातील उत्कृष्ट निकाल कायम राखत राज्यात आघाडी घेतली आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांची संख्याही घटली
यंदाच्या निकालात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली असून, ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. गेल्या वर्षी राज्यभरातून ८१ हजार ८०९ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले होते. ही संख्या एकूण विद्यार्थीसंख्येच्या ५.५० टक्के इतकी होती.
मात्र, यंदा ही संख्या घटून ६५ हजार २७९ इतकी झाली आहे. टक्केवारीच्या भाषेत सांगायचे झाल्यास, हे प्रमाण ४.४९ टक्क्यांवर आले आहे. म्हणजेच गुणवंत विद्यार्थ्यांच्या संख्येत जवळपास एक टक्क्यांची घट झाली आहे.
मुंबई विभागातही अशीच स्थिती दिसून आली. गेल्या वर्षी १७ हजार ८९५ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले होते. यंदा ही संख्या घटून १३ हजार ५९१ वर आली आहे.
शिक्षणतज्ज्ञांकडून अभ्यासपद्धतीवर प्रश्नचिन्ह
निकालातील घसरण, मराठी विषयातील कमी यश आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या घटत्या संख्येमुळे शिक्षण क्षेत्रात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. बदलती अभ्यासपद्धती, ऑनलाइन शिक्षणाचा परिणाम, स्पर्धा परीक्षांचा ताण आणि विद्यार्थ्यांवरील मानसिक दबाव यांसारख्या कारणांचा अभ्यास करण्याची गरज शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, पुरवणी परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळणार असली तरी, यंदाचा निकाल शिक्षण व्यवस्थेसाठी आत्मपरीक्षणाचा विषय ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.


