मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र विधान परिषदेवर विधानसभा सदस्यांद्वारे निवडून आलेल्या दहा नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा बुधवारी विधानभवनात पार पडला. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सदस्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते.
विधान परिषद निवडणुकीत दहा जागांसाठी दहा उमेदवारांनीच अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली होती. नियमित द्विवार्षिक निवडणुकीतील नऊ जागांसह एका पोटनिवडणुकीचा समावेश होता. भाजपने सर्वाधिक सहा जागा जिंकल्या असून शिवसेना (शिंदे गट) ला दोन, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांना प्रत्येकी एक जागा मिळाली.
भाजपचे प्रमोद जठार, सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रज्ञा सातव यांनी शपथ घेतली. शिवसेना (शिंदे गट) कडून डॉ. नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांचा समावेश होता. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून झिशान सिद्दीकी, तर शिवसेना (ठाकरे गट) कडून माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली.
पक्षनिहाय नवनिर्वाचित सदस्य
प्रमोद जठार – भाजप
सुनील कर्जतकर – भाजप
माधवी नाईक – भाजप
संजय भेंडे – भाजप
विवेक कोल्हे – भाजप
प्रज्ञा सातव – भाजप
डॉ. नीलम गोऱ्हे – शिवसेना (शिंदे गट)
बच्चू कडू – शिवसेना (शिंदे गट)
झिशान सिद्दीकी – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
अंबादास दानवे – शिवसेना (ठाकरे गट)
विधान परिषदेची रचना कशी?
महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्यसंख्या ७८ आहे. त्यापैकी ३० सदस्यांची निवड आमदारांकडून केली जाते. २२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून, सात पदवीधर मतदारसंघातून आणि सात शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात. उर्वरित १२ सदस्यांची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते.
विधानसभेतील सध्याचे संख्याबळ
राज्यातील सध्याच्या राजकीय चित्रात महायुतीकडे स्पष्ट बहुमत आहे. भाजपचे १३१, शिवसेना (शिंदे गट) चे ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ४० आमदार आहेत. मित्रपक्ष व अपक्षांच्या पाठिंब्यासह महायुतीचे एकूण संख्याबळ २३४ वर पोहोचते. दुसरीकडे महाविकास आघाडीकडे काँग्रेसचे १६, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे १० आणि शिवसेना (ठाकरे गट) चे २० असे मिळून ४९ आमदारांचे बळ आहे.


