रणजित मस्के, प्रतिनिधी
बीड : मोक्का अंतर्गत दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा आणि बीड शहर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली. आरोपीकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस आणि रिकामी पुंगळी जप्त करण्यात आली असून या कारवाईमुळे बीड शहरात खळबळ उडाली आहे.
पोलीस ठाणे पेठ बीड येथे दाखल गुन्हा क्रमांक 383/2024 मध्ये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद असून त्यामध्ये मोक्का लावण्यात आला होता. या गुन्ह्यातील इतर आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र, आरोपी आशीष शामराव आठवले हा गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. तो सतत ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना चकवा देत होता.
दरम्यान, आरोपी आशीष आठवले याने बीड शहरातील समर्थ बिअर शॉपी येथे उधारीवर बिअर मागितली होती. दुकानदाराने नकार दिल्यानंतर आरोपीने गावठी पिस्तूलातून गोळीबार करून दुकानदाराला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 92/2026 दाखल करण्यात आला होता.
या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला होता. स्थानिक गुन्हे शाखेला आरोपी कबाडगल्ली परिसरातून मोटारसायकलवरून जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याचा पाठलाग केला. पोलिसांना पाहताच आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस अंमलदार अशफाक सय्यद यांनी धाडस दाखवत आरोपीला मिठी मारून पकडले. त्यावेळी आरोपीकडून गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि रिकामी पुंगळी जप्त करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार सोमनाथ गायकवाड, अशोक दुबाले, राहुल शिंदे, पोलीस अंमलदार अशफाक सय्यद, मनोज परजणे, चालक नितीन वडमारे तसेच बीड शहर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार शहेंशाह सय्यद, राम पवार, संतोष शिंदे, इलियास शेख आणि चालक फिरोज पठाण यांनी संयुक्तपणे पार पाडली.


