स्वप्नील गाडे,प्रतिनिधी
भायखळा येथील माझगाव परिसरात भरदिवसा गोळीबार करून एका व्यक्तीची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई करत अवघ्या २४ तासांत गुन्ह्याचा उलगडा केला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, १२ मे २०२६ रोजी सायंकाळी ५.४५ च्या सुमारास डॉकयार्ड रोडवरील माझगाव येथील मिनाक्षी अपार्टमेंट परिसरात समीर मोहम्मद असीफ खान (४१) यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ३०८, ३(५), महाराष्ट्र पोलीस कायदा आणि शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अशी झाली अटक
घटनेचे गांभीर्य ओळखून मुंबई गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला होता. तपासादरम्यान गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाला हे आरोपी माहिम दर्गा परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीनुसार, पोलिसांनी १३ मे च्या मध्यरात्री माहिम परिसरात सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. तपासात आरोपी क्रमांक १ (वय ३०) याने गोळी झाडली असून आरोपी क्रमांक २ (वय ३३) हा त्याचा मुख्य साथीदार असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल, मोटारसायकल आणि मोबाईल फोन जप्त केला आहे.
यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई
ही यशस्वी कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त राज तिलक रौशन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सदानंद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली.


