विरार प्रतिनिधी
अवैध खाण माफियांच्या दहशतीने महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे. विरारमधील शिरगाव परिसरात बेकायदेशीर खाणीविरोधात आवाज उठवणारे RTI कार्यकर्ते आत्माराम पाटील यांची भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या खाणीविरोधात त्यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या, त्याच खाणीमध्ये त्यांचा रक्ताने माखलेला मृतदेह फेकून देण्यात आला.
मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही थरारक घटना उघडकीस आली. स्थानिक नागरिकांना खाणीच्या परिसरात रक्ताच्या थारोळ्यात आत्माराम पाटील यांचा मृतदेह आढळून आला. आरोपींनी मोठ्या दगडाने त्यांच्या डोक्यावर सपासप वार करत त्यांची निर्घृण हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेने विरारसह संपूर्ण पालघर जिल्ह्यात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सरकारी अधिकाऱ्यांसमोरच जीवघेणा हल्ला
या हत्येचा घटनाक्रम अक्षरशः अंगावर काटा आणणारा आहे. वसई तहसीलदार कार्यालयातील सर्कल अधिकारी प्रभाकर पाटील हे अन्य अधिकारी आणि चालकासह शिरगाव येथील अवैध खाणीच्या तक्रारीची पाहणी करण्यासाठी गेले होते. परिसराची माहिती देण्यासाठी त्यांनी आत्माराम पाटील यांना त्यांच्या घरातून सोबत घेतले होते.
मात्र खाणीच्या परिसरात पोहोचताच आधीपासून दबा धरून बसलेल्या पाच ते सहा जणांच्या टोळीने अचानक हल्ला चढवला. आरोपींनी प्रथम सरकारी अधिकारी प्रभाकर पाटील यांच्यावर धावून जात मारहाण केली. त्यांच्या कानाला दुखापत झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून आत्माराम पाटील हे अधिकाऱ्यांच्या मदतीला धावले. पण त्याच क्षणी माफियांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.
मोठमोठ्या दगडांनी डोक्यावर प्रहार करत आरोपींनी आत्माराम पाटील यांना अक्षरशः ठेचून काढले. काही क्षणांतच त्यांचा जागीच मृत्यू झाला. सरकारी अधिकाऱ्यांसमोरच घडलेल्या या रक्तरंजित हत्येमुळे प्रशासनाची सुरक्षा व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
“तक्रारी मागे घे, नाहीतर संपवू”; आधीच मिळाल्या होत्या धमक्या
आत्माराम पाटील हे गेल्या पाच वर्षांपासून परिसरातील अवैध खाण व्यवसायाविरोधात लढा देत होते. खाणीत होणाऱ्या डायनामाईट स्फोटांमुळे घरांना तडे जात होते, तर धुळीच्या प्रदूषणामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले होते. याविरोधात त्यांनी प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या होत्या.
या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. आत्माराम यांचे पुतणे जयेश पाटील यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, खाण मालक महेश पाटील याने यापूर्वीही आत्माराम यांच्यावर हल्ला केला होता. इतकेच नव्हे, तर हत्येच्या आदल्या रात्री महेश पाटीलचा मुलगा मयूर याने फोन करून “तक्रारी बंद कर, नाहीतर जिवंत ठेवणार नाही,” अशी धमकी दिली होती.
या धमक्यांमुळे ही हत्या पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे.
खाण मालकावर हत्येचा गुन्हा; आरोपी फरार
घटनेनंतर विरार पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपी आणि खाण मालक महेश पाटील याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, सरकारी अधिकाऱ्यावर हल्ला करणे, कट रचून हत्या करणे अशा गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
घटनास्थळावरून रक्ताने माखलेले दगड आणि इतर महत्त्वाचे पुरावे पोलिसांनी जप्त केले आहेत. मात्र घटनेनंतर आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
“माफियांविरोधात बोललात तर मृत्यू अटळ?” – प्रशासनावर संतप्त सवाल
अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या एका सामान्य RTI कार्यकर्त्याची भरदिवसा हत्या होत असेल, तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कुणाकडे पाहायचे, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. सरकारी अधिकाऱ्यांसमोरच हत्या होत असल्याने खाण माफियांचे धाडस किती वाढले आहे, याचीच चर्चा सुरू झाली आहे.
या घटनेनंतर विरार परिसरात संतापाची लाट उसळली असून दोषींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


