सातारा प्रतिनिधी
राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सातारा दौऱ्याने जिल्ह्यातील राजकारणाला नव्याने चालना मिळाली आहे. विशेष म्हणजे या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकाच ठिकाणी दिसून आल्याने आगामी राजकीय घडामोडींविषयी चर्चांना उधाण आले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर पहिल्यांदाच साताऱ्यात अशी राजकीय ‘एकत्रित उपस्थिती’ पाहायला मिळाल्याने जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त दोन दिवस सातारा दौऱ्यावर असलेल्या पवारांनी जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि संघटनात्मक घडामोडींचा सखोल आढावा घेतला. या वेळी पवार गटाचे माजी खासदार श्रिनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली.
त्याचवेळी अजित पवार गटातील खासदार नितीन पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, अनिल देसाई, बाळासाहेब सोळसकर, प्रभाकर देशमुख, संदीप मांडवे आदी नेत्यांनीही पवारांशी संवाद साधला. या भेटींमध्ये केवळ औपचारिक चर्चा न होता आगामी राजकीय रणनीती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, भाजपचा वाढता प्रभाव आणि त्याला रोखण्यासाठीची संभाव्य भूमिका यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भाजपच्या वाढत्या प्रभावावर चर्चा
सातारा जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत भाजपने ग्रामीण भागात वाढवलेला प्रभाव आणि सहकारी संस्थांमध्ये निर्माण केलेली पकड याबद्दल पवारांनी कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली. जिल्हा परिषद सत्तास्थापनेदरम्यान झालेल्या राजकीय घडामोडींवर त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जाते. बहुमताच्या गणितानंतरही भाजपने वापरलेल्या रणनीतीबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त करत संघटनात्मक पातळीवर अधिक सजग राहण्याच्या सूचना दिल्याची चर्चा आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने काही ठिकाणी एकत्रितपणे निवडणुका लढवल्यानंतर स्थानिक पातळीवर काय परिणाम झाला, याचाही आढावा बैठकीत घेण्यात आला. भविष्यातील निवडणुकांमध्ये ‘समन्वय’ कितपत फायदेशीर ठरू शकतो, यावरही चर्चा झाल्याचे समजते.
पाणीटंचाई, शेती आणि पशुधनाच्या प्रश्नांवरही भर
राजकीय चर्चांबरोबरच पवारांनी सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई, शेतीच्या पाण्याचे प्रश्न, पशुधनासाठी चारा व पाण्याची उपलब्धता याबाबतही स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. ग्रामीण भागातील अडचणींबाबत त्यांनी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका मांडल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
‘नेतृत्वाची पोकळी’ आणि आगामी समीकरणे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर जिल्ह्यात निर्माण झालेल्या नेतृत्वाच्या पोकळीबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले जाते. साताऱ्यातील पारंपरिक राष्ट्रवादी मतदारसंघ पुन्हा मजबूत करण्यासाठी संघटनात्मक पुनर्बांधणीची आवश्यकता असल्याचे मत अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही काही महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. सहकार क्षेत्रातील बदलती समीकरणे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या राजकीय परिणामांचा अंदाज घेत पवारांनी काही सूचक मार्गदर्शन केल्याचे समजते.
स्वागत कमानींनी लक्ष वेधले
पवारांच्या दौऱ्यादरम्यान साताऱ्यात विविध ठिकाणी भव्य स्वागत कमानी, फलक आणि बॅनर्स लावण्यात आले होते. ग्रामीण भागातून आलेल्या युवक कार्यकर्ते, महिला आघाडीच्या सदस्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. त्यामुळे हा दौरा केवळ पुण्यतिथीपुरता मर्यादित न राहता आगामी राजकीय हालचालींची ‘नांदी’ ठरल्याची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे.
राज्यातील सत्तासमीकरणे वेगाने बदलत असताना साताऱ्यात दोन्ही राष्ट्रवादी गटांचे नेते एकत्र दिसणे, शरद पवारांनी स्वतंत्रपणे सर्वांशी चर्चा करणे आणि संघटनात्मक सूचनाही देणे यामुळे पुढील काही महिन्यांत जिल्ह्यात मोठ्या राजकीय हालचाली घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


