सातारा प्रतिनिधी
सातारा तालुक्यातील कासरतळे परिसरात शुक्रवारी रात्री भीषण अपघात घडून आयशर ट्रक तब्बल ५० फूट खोल दरीत कोसळल्याने एका लहान मुलासह तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. पुनर्वसनानंतर घरातील साहित्य वाहून नेण्यासाठी निघालेल्या या ट्रकमध्ये काही पशुधनही असल्याची माहिती असून, अपघातात जनावरांचाही मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुनर्वसित कुटुंबाचे घरगुती साहित्य आयशर ट्रकमध्ये भरले जात होते. कासरतळे परिसरातील अरुंद आणि उताराच्या रस्त्यावर ट्रक उभा असताना अचानक तोल जाऊन वाहन रस्त्यालगतच्या दरीत कोसळले. अंदाजे ५० फूट खोल दरीत ट्रक कोसळताच मोठा आवाज झाला. आवाज ऐकून ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
या अपघातात ट्रकमध्ये असलेल्या चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका लहान मुलासह तीन महिलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ट्रक चालक मात्र या अपघातातून बचावल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर सातारा तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य राबवत जखमींना बाहेर काढले. रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते. दरीतील अंधार आणि अवघड भूभागामुळे बचावकार्याला अडथळे निर्माण होत होते.
दरम्यान, हा अपघात नेमका कसा घडला, याबाबत विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. ट्रक उभा असलेल्या रस्त्याच्या कडेला जमीन खचली होती का, वाहन चुकीच्या पद्धतीने उभे करण्यात आले होते का, अथवा भार अधिक झाल्याने ट्रकचा तोल गेला का, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या दुर्दैवी घटनेमुळे कासरतळे परिसरात शोककळा पसरली असून, ग्रामस्थांकडून मृतांच्या कुटुंबीयांप्रती हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


