नागपूर प्रतिनिधी
आखाती देशांतील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचे परिणाम आता भारतातही जाणवू लागले असून पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या पुरवठ्यावर त्याची झळ बसत असल्याचे चित्र आहे. राज्यातील अनेक भागांत इंधनटंचाईची परिस्थिती निर्माण होत असताना, नागरिकांनी संयम आणि जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीबाबत केलेल्या आवाहनाची अंमलबजावणी प्रत्येक नागरिकाने करावी, असे ते म्हणाले.
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावामुळे जागतिक स्तरावर कच्चे तेल आणि गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक देशांमध्ये इंधनाचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले असून शेजारील पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे दर साडेचारशे रुपयांवर गेल्याचा उल्लेख करत फडणवीसांनी परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित केले.
“भारताकडे स्वतःच्या मोठ्या तेलविहिरी नाहीत. त्यामुळे जागतिक संकटांचा परिणाम देशावर होतो. तरीही केंद्र सरकारने पुरवठा खंडित होऊ दिलेला नाही. मात्र, नागरिकांनीही इंधनाचा काटकसरीने वापर केला नाही, तर पुढील काळात अडचणी वाढू शकतात,” असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, हैदराबादमधील कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांनीही देशवासीयांना इंधन बचतीचा संदेश दिला. मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर, ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ऑनलाइन बैठकींना प्राधान्य देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. “जागतिक संकटाच्या काळात परकीय चलन साठा टिकवणे आणि कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करणे अत्यंत आवश्यक आहे,” असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदींची नागरिकांना ९ आवाहने
पेट्रोल आणि डिझेलचा वापर जपून करा
खाद्यतेलाचा वापर मर्यादित ठेवा
पुढील एक वर्ष सोन्याची खरेदी टाळा
परदेशी प्रवास शक्यतो टाळा
कच्च्या तेलाची बचत करा
परकीय चलन साठा टिकवण्यावर भर द्या
मेट्रो आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवा
‘वर्क फ्रॉम होम’ व ऑनलाइन बैठकींना प्राधान्य द्या
परकीय उत्पादनांच्या खरेदीवर मर्यादा आणा
राज्यातील वाढती इंधन मागणी आणि जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारकडून ऊर्जा बचतीवर भर दिला जात असून, नागरिकांनीही जीवनशैलीत बदल करून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


