देशभरातील २३ लाख विद्यार्थ्यांमध्ये खळबळ
नागपूर प्रतिनिधी
देशातील वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रियेला हादरा देणाऱ्या NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात अखेर केंद्र सरकारने मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतला आहे. देशभरातील २३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागलेल्या या प्रकरणात NEET-UG 2026 परीक्षा रद्द करण्यात आली असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्यात आली आहे. नव्याने परीक्षा घेण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे देशभरात एकच खळबळ उडाली असून, विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. महाराष्ट्रासह नागपूर, पुणे, मुंबई आणि राज्यातील विविध शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “एक वर्षाची मेहनत वाया गेली”, “आमच्या भविष्याशी खेळ सुरू आहे”, अशा भावना विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहेत.
विशेष म्हणजे काँग्रेस नेत्या आणि लोकसभा खासदार प्रियंका गांधी यांनी सोमवारी सोशल मीडियावर सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांनी परीक्षेतील गैरप्रकारांवरून केंद्र सरकारला थेट लक्ष्य केले होते. त्यांच्या या ट्विटनंतर अवघ्या २४ तासांत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाल्याने राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मार्फत ३ मे रोजी देशातील १५५ शहरांमध्ये NEET-UG 2026 परीक्षा घेण्यात आली होती. महाराष्ट्रात नागपूरसह विविध शहरांमध्ये परीक्षा केंद्रांवर मोठ्या बंदोबस्तात परीक्षा पार पडली. नागपूर शहरात तब्बल ६४ केंद्रांवर परीक्षा झाली होती.
परीक्षा शांततेत पार पडल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र, परीक्षा संपल्यानंतर काही तासांतच सोशल मीडियावर पेपरफुटीचे आरोप समोर येऊ लागले. राजस्थानसह काही राज्यांमध्ये प्रश्नपत्रिका आधीच उपलब्ध झाल्याचे दावे करण्यात आले. तथाकथित ‘गेस पेपर’मधील अनेक प्रश्न प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेशी जुळल्याचेही समोर आले.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने तपास यंत्रणांना चौकशीचे आदेश दिले. प्राथमिक तपासात काही संशयास्पद पुरावे समोर आल्यानंतर अखेर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
NTA चा खुलासा; “विद्यार्थ्यांचा विश्वास महत्त्वाचा”
NTA ने अधिकृत निवेदन जारी करत म्हटले की, “८ मे रोजी हे प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणांकडे सोपवण्यात आले होते. तपास यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या माहिती आणि अहवालांच्या आधारे सध्याची परीक्षा प्रक्रिया निष्पक्ष राहिलेली नाही, असा निष्कर्ष निघाला. राष्ट्रीय परीक्षा व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास कायम राखणे अत्यंत आवश्यक असल्याने परीक्षा रद्द करण्याचा कठोर निर्णय घेण्यात आला.”
तसेच विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसून, आधीची नोंदणी वैध राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. नव्या परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत.
कडक नियम असूनही गैरप्रकार कसा?
यंदा NEET परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी NTA ने अत्यंत कठोर नियम लागू केले होते. विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर बंदी घालण्यात आली होती. ड्रेस कोडपासून बायोमेट्रिक पडताळणीपर्यंत अनेक स्तरांवर तपासणी करण्यात आली होती.
विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रासोबत पोस्टकार्ड आकाराचा फोटो चिकटवणे बंधनकारक करण्यात आले होते. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही, धातू शोधक यंत्रणा आणि स्वतंत्र देखरेख पथके तैनात करण्यात आली होती.
मात्र, इतक्या कडक सुरक्षेनंतरही पेपरफुटी झाल्याचे समोर आल्याने संपूर्ण परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनीही “ही केवळ चूक नसून व्यवस्थेचे अपयश आहे,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रियंका गांधींचा सरकारवर घणाघात
प्रियंका गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यांनी म्हटले होते :
“पुन्हा एकदा NEET परीक्षेतील अनियमिततेच्या बातम्या समोर येत आहेत. भाजपच्या राजवटीत भ्रष्टाचाराने देशातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे. लाखो विद्यार्थी अथक परिश्रम घेतात, पालक सर्वस्व पणाला लावतात; मात्र प्रत्येक परीक्षा पेपरफुटीची शिकार होते. जर हेच सुरू राहणार असेल तर पेपरफुटीविरोधी कायद्याचा उपयोग काय?”
त्यांच्या या टीकेनंतर विरोधकांनीही केंद्र सरकार आणि NTA वर निशाणा साधला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता
परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी मानसिक अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेक विद्यार्थी वर्षभर कोचिंग क्लासेस, अभ्यास आणि सराव परीक्षांमध्ये गुंतले होते. काही विद्यार्थ्यांनी तर ग्रामीण भागातून शहरात स्थलांतर करून तयारी केली होती.
नागपूरमधील एका विद्यार्थ्याने सांगितले, “आम्ही दिवस-रात्र अभ्यास केला. आता पुन्हा परीक्षा म्हणजे पुन्हा तोच ताण, तीच धावपळ. चुकी कुणाची आणि शिक्षा कुणाला?”
पालक संघटनांनीही या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
CBI चौकशीत मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता
पेपरफुटी प्रकरणात CBI चौकशीचे आदेश देण्यात आल्याने आता देशव्यापी रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही संशयितांवर तपास यंत्रणांनी लक्ष केंद्रीत केले आहे.
तपासात कोचिंग क्लासेस, दलाल आणि काही स्थानिक नेटवर्कचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त होत आहे. आगामी काही दिवसांत अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे.
आता पुढे काय?
केंद्र सरकार आणि NTA कडून नव्या परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत संकेतस्थळावरील माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, NEET पेपरफुटी प्रकरणामुळे पुन्हा एकदा देशातील स्पर्धा परीक्षा व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून, “पेपरफुटी थांबणार कधी?” हा प्रश्न आता संपूर्ण देश विचारत आहे.


