पैठण प्रतिनिधी
पैठण तालुक्यातील ब्राह्मणगाव तांडा येथे भीषण पाणीटंचाईने ग्रामस्थांचे जनजीवन अक्षरशः विस्कळित झाले असून, पिण्याच्या पाण्यासाठी महिला आणि लहान मुलांना दररोज दोन ते तीन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. तळपत्या उन्हात केवळ हंडाभर पाण्यासाठी सुरू असलेली ही जीवघेणी धडपड पाहून प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. गावातील विहिरी आणि बोअरवेल कोरड्या पडल्याने परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.
“आता आमचं वय झालंय… आम्ही चालायचं कसं अन् पाणी शोधायचं कुठं? विकत पाणी घ्यायचं म्हटलं, तर एका ड्रमसाठी ७० रुपये मोजावे लागतात. ते पैसे आणायचे कुठून?” असा हतबल सवाल करत ६५ वर्षीय राधाबाई राठोड यांनी गावातील भीषण वास्तव मांडले.
गावातील महिलांना पाण्यासाठी तासन्तास विहिरीवर थांबावे लागत असून, दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर अवघा एक हंडा पाणी मिळत असल्याची व्यथा ग्रामस्थांनी व्यक्त केली. पिण्याच्या पाण्यासाठी होणाऱ्या या संघर्षामुळे घरगुती कामांपासून जनावरांच्या देखभालीपर्यंत सर्वच गोष्टींवर परिणाम होत आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीने टँकर सुरू करण्यासाठी तालुका प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. मात्र, गावात पाणीटंचाई नसल्याचे कारण देत हा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच ‘जल जीवन मिशन’ योजनेंतर्गत गावाला अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याने प्रशासन व लोकप्रतिनिधींविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
मराठवाड्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढत असताना ब्राह्मणगाव तांड्यातील परिस्थिती आणखी बिकट होत आहे. अनेक कुटुंबांतील आई-वडील ऊसतोडीसाठी बाहेरगावी गेल्याने घरातील लहान मुलांवरच पाणी आणण्याची जबाबदारी येऊन पडली आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणावरही विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र समोर आले आहे.
“माझे आई-वडील ऊसतोडीसाठी बाहेरगावी गेलेले आहेत. मी, माझा भाऊ आणि आजी घरी असतो. त्यामुळे शाळा करावी की पाणी आणावं, हेच समजत नाही. मी लहान असल्याने विहिरीतून पाणी काढण्यासाठी इतर महिलांची मदत घ्यावी लागते,” अशी व्यथा विद्यार्थिनी निकीता जाधव हिने व्यक्त केली.
ग्रामस्थांकडून वारंवार मागणी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने प्रशासनाविरोधातील नाराजी अधिक तीव्र होत आहे. तातडीने टँकर सुरू करून कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
सरपंच वर्षा सांगळे म्हणाल्या, “टँकर सुरू करण्यासाठी आम्ही प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. मात्र, गावात पाणीटंचाई नसल्याचे सांगून तो फेटाळण्यात आला. तसेच ‘जल जीवन मिशन’च्या कामालाही अद्याप मंजुरी मिळालेली नाही.”
पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी संघर्ष
पाण्याची तीव्र टंचाई असल्याने गावातील महिला पाण्याचा काटकसरीने वापर करत आहेत. लहान मुलांना बाजेवर अंघोळ घालून खाली टोपल्यात जमा झालेले पाणी जनावरांना पाजले जात आहे. “या काळात पाणी जास्त लागेल म्हणून आम्ही पाहुण्यांनाही मुक्कामी राहू देत नाही,” असे काही महिलांनी सांगितले.
एकीकडे शासनाच्या विविध पाणीपुरवठा योजनांची घोषणा होत असताना दुसरीकडे ब्राह्मणगाव तांड्यातील ग्रामस्थांना अजूनही हंडाभर पाण्यासाठी उन्हातान्हात भटकंती करावी लागत असल्याने प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.


