भंडारा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यंदा राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला असून, नेहमीप्रमाणे मुलींनी आघाडी कायम ठेवली. निकालानंतर बहुतांश ठिकाणी आनंदाचे वातावरण असताना भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली. बारावीच्या परीक्षेत अपयश आल्याच्या नैराश्यातून १८ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
तुमसर तालुक्यातील रोंघा येथील नावेद होलाराम खंडाते असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. नावेदने यंदा बारावीची परीक्षा दिली होती. शनिवारी निकाल जाहीर झाल्यानंतर तो अनुत्तीर्ण झाल्याचे समजताच तो मानसिक तणावाखाली गेला होता, अशी माहिती स्थानिकांनी दिली. दुपारच्या सुमारास त्याने गावाजवळील शेतात जाऊन गळफास घेत जीवन संपवले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या घटनेमुळे खंडाते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, आई-वडिलांवर शोककळा पसरली आहे. गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी विद्यार्थ्यांवरील वाढता मानसिक ताण आणि निकालानंतर निर्माण होणारे नैराश्य याबाबत चिंता व्यक्त केली.
दरम्यान, याच निकालात भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यशही मिळवले आहे. मार्च २०२६ मध्ये झालेल्या परीक्षेत जिल्ह्याचा निकाल ८४.१२ टक्के लागला असून नागपूर विभागात पाचवे स्थान मिळाले. नूतन कन्या ज्युनिअर कॉलेजच्या गीतिका श्याम धूत हिने सर्व संकायांतून १०० टक्के गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच पल्लवी सतीश बाभरे (९८.५० टक्के) हिने जिल्ह्यात द्वितीय, तर अपूर्वा गिरधारी भेलावे (९७.६७ टक्के) हिने तृतीय क्रमांक मिळवला.
तथापि, या यशाच्या पार्श्वभूमीवर घडलेली नावेद खंडाते याची आत्महत्या ही घटना शिक्षण व्यवस्थेसमोर गंभीर प्रश्न उभा करते. परीक्षेतील अपयशामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारा मानसिक ताण, अपेक्षांचा दबाव आणि त्यातून उद्भवणारे नैराश्य याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
महत्त्वाची नोंद
आत्महत्या हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही. परीक्षेत अपयश आले तरी जीवनात पुढे जाण्याचे अनेक मार्ग उपलब्ध असतात. अशा वेळी कुटुंबीय, मित्र किंवा समुपदेशक यांच्याशी संवाद साधणे महत्त्वाचे ठरते. अडचणीच्या क्षणी मदत मागणे ही कमजोरी नसून योग्य दिशा निवडण्याची सुरुवात असते.


