मुंबई प्रतिनिधी
राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल घडवून आणण्याच्या दिशेने राज्य सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) अनुषंगाने इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि आता सहावीच्या अभ्यासक्रम आराखड्यालाही मंजुरी देण्यात आली असून, जून २०२६ पासून नवीन अभ्यासक्रम आणि नवीन पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती येणार आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमासाठीच्या राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या बैठकीत सहावीच्या अभ्यासक्रमाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीला शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह, राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे (एससीईआरटी) संचालक डॉ. हेमंत वसेकर, बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक, माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर, योजना शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांच्यासह सुकाणू समितीचे सदस्य उपस्थित होते.
राज्य सरकारने यापूर्वी दुसरी, तिसरी आणि चौथीच्या अभ्यासक्रम आराखड्यांना मंजुरी दिली होती. आता सहावीचा समावेश झाल्याने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या संक्रमण टप्प्यातील विद्यार्थ्यांसाठी नवे शैक्षणिक स्वरूप तयार होणार आहे. येत्या जूनपासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक सत्रात हे बदल प्रत्यक्षात लागू केले जाणार आहेत.
अध्ययन निष्पत्तीवर भर
नवीन अभ्यासक्रमाची रचना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तत्त्वांनुसार करण्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीवर विशेष भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे वय, समज, आकलन क्षमता आणि टप्प्याटप्प्याने वाढणारी काठिण्यपातळी लक्षात घेऊन अभ्यासक्रमाची मांडणी करण्यात आली आहे. पारंपरिक पाठांतरावर आधारित शिक्षणाऐवजी कौशल्याधारित, कृतीप्रधान आणि समज वाढविणाऱ्या शिक्षणपद्धतीला प्राधान्य दिले जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
राज्य सुकाणू समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रारूप आता शालेय शिक्षण आयुक्तांकडे असलेल्या अभ्यासक्रम समन्वय समितीकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर बालभारतीकडून नव्या पाठ्यपुस्तकांची छपाई आणि वितरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर राबविण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वीच सर्व पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
शिक्षक प्रशिक्षणालाही गती
अभ्यासक्रम बदलाबरोबरच शिक्षक प्रशिक्षणालाही प्राधान्य देण्यात आले आहे. दुसरी, तिसरी आणि चौथीच्या नव्या अभ्यासक्रमावरील शिकवणी पद्धती, अध्यापन कौशल्ये आणि मूल्यांकन प्रणाली यांसाठी एससीईआरटीतर्फे राज्यस्तरीय मुख्य प्रशिक्षण कार्यक्रम याच महिन्यात आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर जिल्हास्तरावर शिक्षकांचे प्रशिक्षण घेतले जाणार असून, टप्प्याटप्प्याने सर्व शिक्षकांना नव्या पद्धतीची ओळख करून दिली जाणार आहे.
शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने वेग घेतला असून, विद्यार्थ्यांना अधिक समजून घेणारे, व्यवहार्य आणि कौशल्याधारित शिक्षण देण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. नव्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा ताण कमी होऊन संकल्पनाधारित शिक्षणाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नव्या अभ्यासक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये
अंमलबजावणी जून २०२६ पासून
इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीसाठी नवीन अभ्यासक्रम
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आधारित आराखडा
अध्ययन निष्पत्ती आणि कौशल्याधारित शिक्षणावर भर
बालभारतीकडून नवीन पाठ्यपुस्तकांची निर्मिती व वितरण
राज्य आणि जिल्हास्तरावर शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित
विद्यार्थ्यांच्या आकलनक्षमतेनुसार काठिण्यपातळी निश्चित करण्यात येणार
दरम्यान, बारावीच्या निकालानंतर आता राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालकांना दहावीच्या निकालाची उत्सुकता लागली असून, राज्य मंडळाकडून निकालाची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


