कोलकाता :
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत दीर्घकाळ सत्तेवर असलेल्या ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसची सत्ता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. प्राथमिक कलांनुसार भारतीय जनता पक्षाने राज्यात स्पष्ट बहुमताच्या दिशेने कूच करत सत्ता हस्तगत करण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाच त्यांच्या पारंपरिक भवानीपूर मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
भवानीपूर मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातच भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी विजय मिळवत ‘जायंट किलर’ ठरले. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये ममता बॅनर्जी आघाडीवर होत्या. पहिल्या १५ फेऱ्यांपर्यंत त्यांनी आघाडी कायम राखली होती. मात्र त्यानंतर परिस्थिती झपाट्याने बदलली आणि १६व्या फेरीपासून सुवेंदू अधिकारी यांनी आघाडी घेतली. अखेरच्या फेऱ्यांपर्यंत ही आघाडी टिकवत त्यांनी निर्णायक विजय संपादन केला.
राज्यभरातील चित्र पाहता भाजपने १४७ या बहुमताच्या आकड्यापेक्षा मोठी झेप घेत २०० हून अधिक जागांवर आघाडी मिळवली आहे. याउलट तृणमूल काँग्रेसला शंभरी गाठणेही कठीण बनले आहे. त्यामुळे तब्बल दीड दशकानंतर पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर अटळ मानले जात आहे.
दरम्यान, या निवडणुकीत केवळ पश्चिम बंगालपुरतेच नव्हे, तर देशभरातील राजकीय समीकरणांवर परिणाम करणारे निकाल समोर आले. तामिळनाडूमध्ये सत्ताधारी एम. के. स्टॅलिन यांना पराभवाचा धक्का बसला, तर केरळमध्येही पिनराई विजयन यांना मतदारांनी नाकारले. त्यामुळे एका दिवसात तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा पराभव झाल्याने देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचे मानले जात आहे.
पश्चिम बंगालमधील निकालांमुळे भाजपसाठी हा ऐतिहासिक विजय ठरत असून पूर्व भारतातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. दुसरीकडे, तृणमूल काँग्रेससमोर संघटनात्मक पुनर्रचनेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.


