कोलकाता:
चंद्रनाथ रथ यांची बुधवारी रात्री उशिरा अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगालमध्ये घडली. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे. भाजप नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार मानले जात असले सुवेंदू अधिकारी यांच्या निकटवर्तीयाची हत्या झाल्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
VIDEO | BJP leader Suvendu Adhikari's personal assistant Chandranath Rath was shot at from close range by unidentified assailants in West Bengal's North 24 Parganas district on Wednesday night, sources said.
(Source: Third Party)
(Full video available on… pic.twitter.com/L1QAKFI60N
— Press Trust of India (@PTI_News) May 6, 2026
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील मधयामारगम परिसरात घडली. रात्रीच्या सुमारास चंद्रनाथ रथ हे कोलकात्यातून आपल्या घरी परतत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या कारला महामार्गावर अडवले आणि अचानक गोळीबार सुरू केला. हल्लेखोरांनी जवळून अनेक फेऱ्या झाडल्याने कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. कारची विंडशील्ड पूर्णपणे फुटल्याचेही सांगण्यात येत आहे.
या हल्ल्यात चंद्रनाथ रथ यांच्या छातीत तीन गोळ्या लागल्या. अतिरक्तस्रावामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. कारमधील चालकही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जखमी चालकाला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसर सील केला. तसेच राँपीड अँक्शन फोर्स आणि केंद्रीय सुरक्षा दलांच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, वाहनांची हालचाल आणि हल्लेखोरांच्या पळून जाण्याच्या मार्गांचा तपास सुरू आहे.
दरम्यान, भाजपच्या अनेक विजयी उमेदवारांनी घटनास्थळी भेट देत निषेध व्यक्त केला. पक्षाच्या नेत्यांनी या हल्ल्याला “राजकीय सूडातून घडवलेली घटना” असल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे प्रशासनाने कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी तपास पूर्ण होऊ द्यावा, असे आवाहन केले आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विविध भागांत हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. अनेक ठिकाणी राजकीय कार्यकर्त्यांवर हल्ले, जाळपोळ आणि गोळीबाराच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच चंद्रनाथ रथ यांच्या हत्येमुळे पश्चिम बंगालमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.


