बारामती प्रतिनिधी
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अभूतपूर्व कामगिरी करत केवळ विजयच मिळवला नाही, तर देशातील सर्वाधिक मताधिक्याचा नवा इतिहासही रचला आहे. तब्बल २ लाख १८ हजार ९३० मतं मिळवत त्यांनी विरोधकांचा पूर्णपणे धुव्वा उडवला. विशेष म्हणजे, या निवडणुकीत उभ्या असलेल्या सर्वच उमेदवारांचे अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्त झाल्याने हा विजय एकतर्फी ठरला आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मला भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल तमाम मायबाप बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार.आपण दाखवलेला विश्वास, प्रेम आणि पाठिंबा माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे.
आदरणीय अजितदादांच्या पश्चात झालेली बारामतीची ही पहिलीच निवडणूक होती.त्यांच्या मार्गदर्शनाची आणि… pic.twitter.com/XRv49EWMy3
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) May 4, 2026
देशातील सर्वात मोठं मताधिक्य
बारामती पोटनिवडणुकीच्या २४ व्या फेरीअखेर सुनेत्रा पवार यांना २,१८,९३० मते मिळाली. यासह त्यांनी उत्तर प्रदेशातील साहिबाबाद मतदारसंघात सुनील कुमार शर्मा यांनी २०२२ मध्ये मिळवलेल्या २,१४,८३५ मतांच्या विक्रमालाही मागे टाकलं. त्यामुळे देशातील सर्वाधिक मताधिक्याचा नवा मान आता सुनेत्रा पवार यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.
अजित पवारांचा विक्रमही मोडीत
या विजयानं बारामतीतीलच नव्हे, तर राज्यातील मोठा विक्रमही मोडीत निघाला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी मिळवलेलं १ लाख ६५ हजार मताधिक्य सुनेत्रा पवारांनी मागे टाकलं. विशेष म्हणजे, १९ व्या फेरीतच त्यांनी हा टप्पा पार केला, जे त्यांच्या प्रचंड जनसमर्थनाचं द्योतक आहे.
‘हा विजय नाही, भावनांचा सन्मान’
विजयानंतर मुंबईतील मंत्रालयाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना सुनेत्रा पवार भावुक झाल्याचं दिसून आलं.
“ही निवडणूक माझ्यासाठी अनपेक्षित होती. दादांनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. मन भरून येत आहे. बारामतीकरांनी दाखवलेला विश्वास हा दादांप्रतीची भावना आणि त्यांनी केलेल्या विकासकामांना दिलेली आदरांजली आहे,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
विकासाच्या विश्वासाला मतदारांची साथ
“बारामतीकरांनी केलेलं मतदान हे दादांवरील प्रेम आणि माझ्यावर टाकलेली जबाबदारी आहे. त्यांनी दाखवलेली विकासाची स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता माझ्यावर आहे,” असं सांगत त्यांनी मतदारांचे आभार मानले.
जल्लोष टाळण्याचं आवाहन
विजयानंतरही संयम राखत सुनेत्रा पवार यांनी समर्थकांना जल्लोष टाळण्याचं आवाहन केलं.
“ही निवडणूक जल्लोषाची नाही, तर भावनांची आहे. बारामतीकरांनी दिलेलं मत हे एक प्रकारचं श्रद्धांजली आहे. दादांनी जपलेली शिस्त आणि संयम आपणही जपायला हवा,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
बारामती म्हणजे कुटुंब
बारामतीकरांशी असलेल्या नात्याचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या, “बारामती हे माझं कुटुंब आहे. जनतेनं दाखवलेल्या विश्वासाला मी पात्र ठरण्याचा प्रयत्न करेन.” तसेच, लवकरच बारामतीत जाऊन मतदारांचे आभार मानणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
सुनेत्रा पवार यांचा हा विजय केवळ राजकीय यश नाही, तर भावनिक लाट, विकासावरचा विश्वास आणि नेतृत्वावरची निष्ठा यांचा संगम ठरला आहे. बारामतीतून उठलेली ही लाट आता राज्याच्या राजकारणातही दूरगामी परिणाम घडवण्याची चिन्हे दिसत आहेत.


