बारामती प्रतिनिधी
बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून काँग्रेसने या निवडणुकीतून माघार घेण्याचे संकेत दिले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी पक्षाकडून माघार घेण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींना कळवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली होती. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंती त्यांनी केली असल्याची माहिती समोर आली आहे. या चर्चेनंतर काँग्रेसमधील राज्यस्तरीय नेत्यांनी परिस्थितीचा आढावा घेत माघारीचा पर्याय स्वीकारण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार विजय यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता या निवडणुकीत थांबावे, असे आमचे मत झाले आहे. आज प्रदेशाध्यक्षांमार्फत ही भूमिका हायकमांडपर्यंत पोहोचवण्यात येईल. त्यानंतर पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेतील.”
ते पुढे म्हणाले की, एखाद्या लोकप्रतिनिधीचे निधन झाल्यानंतर त्या जागेची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा पूर्वीपासून राजकारणात होती. मात्र गेल्या काही वर्षांत भारतीय जनता पक्षाने ही परंपरा कायम ठेवलेली दिसत नाही. “प्रथा-परंपरा पाळल्या जात नसल्यामुळेच आम्ही यावेळी उमेदवारी अर्ज भरला होता,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
बारामतीतील दिवंगत नेते अजित पवार यांच्याबद्दल बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, अजितदादांवर अनेकांचे प्रेम होते आणि महाराष्ट्रातील जनतेमध्ये त्यांचे वेगळे स्थान होते. त्यांच्या पत्नी निवडणुकीच्या मैदानात असल्याने राज्यातील तीन प्रमुख काँग्रेस नेत्यांमध्ये चर्चा होऊन माघारीचा निर्णय घेण्याबाबत एकमत झाले आहे. हा निर्णय पक्षश्रेष्ठींना कळवला जाईल आणि त्यानंतर योग्य ती घोषणा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राज्य सरकारच्या पातळीवरही हालचाली सुरू असल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांना दूरध्वनी करून या संदर्भात चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी भाजपकडून कोणताही संपर्क साधण्यात आलेला नसल्याचे काँग्रेसकडून सांगितले जात होते.
बारामती पोटनिवडणुकीबाबत अंतिम निर्णय उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपूर्वी जाहीर होण्याची शक्यता असून काँग्रेसची अधिकृत घोषणा काय होते याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. जर काँग्रेसने माघार घेतली, तर बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.


