बारामती प्रतिनिधी
निरा-बारामती मार्गावरील खामगळपाटी (ता. बारामती) परिसरात गुरुवारी पहाटे धावत्या एसटी बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. चालकाने प्रसंगावधान राखत बस तातडीने थांबवून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र काही मिनिटांतच आगीने भीषण रूप धारण केल्याने बस पूर्णपणे जळून खाक झाली. या घटनेत सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाची निरा-बारामती मार्गावरील बस (एमएच १४ बीटी ४३२८) गुरुवारी सकाळी नियमित फेरीवर होती. सकाळी सुमारे ६.१५ वाजण्याच्या सुमारास खामगळपाटी येथील खडी मशिनकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ बसच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालक धनंजय लिंबराज पवार यांच्या निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने बस रस्त्याच्या कडेला उभी केली.
बसची पाहणी करताना इंजिनच्या खालच्या भागातून धूरासह ज्वाळा बाहेर पडत असल्याचे दिसून आले. त्यानंतर चालक आणि वाहक यांनी कोणतीही वेळ न दवडता बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले. सुरुवातीला बसमधील अग्निशामक यंत्राच्या साहाय्याने आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र इंजिन परिसरातील ऑइल गळतीमुळे आग झपाट्याने पसरू लागली.
याच वेळी चालक धनंजय पवार यांनी दाखविलेल्या धाडसामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. आग वाढत असल्याचे लक्षात येताच त्यांनी बसमधील सीएनजी पुरवठ्याचा कॉक तातडीने बंद केला. त्यामुळे स्फोटाचा धोका कमी झाला आणि मोठी दुर्घटना टळली.
दरम्यान, काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. बसमधील आसने, काचा, विद्युत यंत्रणा आणि अंतर्गत साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. संपूर्ण बस जळून खाक झाली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान आणि वडगाव निंबाळकर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात आला असून प्राथमिक अंदाजानुसार इंजिन विभागातील बिघाड आणि ऑइल गळतीमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेनंतर परिसरात काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. चालकाच्या सतर्कतेमुळे आणि वेळेवर घेतलेल्या निर्णयामुळे अनेक प्रवाशांचे प्राण वाचल्याने त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.
चालकाच्या धाडसाने टळला अनर्थ
बसला आग लागल्यानंतर काही मिनिटांतच परिस्थिती गंभीर बनली होती. अशा वेळी चालक धनंजय पवार यांनी सीएनजी कॉक बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संभाव्य स्फोटाचा धोका टळला. प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढणे आणि आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करणे या दोन्ही बाबींमध्ये चालक व वाहक यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.


