पुणे प्रतिनिधी
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली असून अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी बारामतीकरांना भावनिक साद घालत अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला.

बारामतीत आयोजित संवादात बोलताना सुनेत्रा पवार यांच्या भावना अनावर झाल्या. “फक्त दोन महिन्यांपूर्वी आपण आपले लाडके नेते अजितदादांना गमावले. ही वेळ आपल्या आयुष्यात येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. अजितदादा आज आपल्यात नसले तरी बारामतीच्या प्रत्येक रस्त्यात, प्रत्येक वास्तूमध्ये त्यांचा स्पर्श आहे,” असे सांगताना त्यांचा आवाज दाटून आला.
त्यांनी पुढे सांगितले की, अजितदादांसाठी बारामती ही केवळ राजकीय मतदारसंघ नव्हता, तर आईसारखी होती. “बारामतीतील प्रत्येक नागरिक अजितदादांसाठी पांडुरंगासारखा होता. शेवटचा श्वासही त्यांनी याच मातीत घेतला. त्यामुळे ही निवडणूक केवळ राजकीय प्रक्रिया नाही, तर अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी आहे,” असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र ऐनवेळी काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. अजितदादांना श्रद्धांजली म्हणून निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी महायुतीसह महाविकास आघाडीतील काही नेत्यांकडूनही व्यक्त करण्यात आली होती.
सुनेत्रा पवार यांनी बारामतीच्या विकासासाठी अजितदादांनी घेतलेल्या कष्टांची आठवण करून दिली. “बारामतीला जागतिक दर्जाचे शहर बनवण्याचा अजितदादांचा ध्यास होता. त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी मी माझे वैयक्तिक दु:ख बाजूला ठेवले आहे. बारामतीची प्रतिष्ठा जराही कमी होऊ देणार नाही, याचे मी तुम्हाला वचन देते,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या योगदानाचाही उल्लेख केला. “शरद पवार साहेबांनी बारामतीला विकासाचा दृष्टिकोन दिला आणि अजितदादांनी अथक परिश्रमाने त्या विकासाला नवे कोंदण दिले. या परंपरेला पुढे नेण्याची जबाबदारी आता माझ्यावर आहे,” असे त्यांनी नमूद केले.
सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांनाही भावनिक संदेश दिला. “दादांच्या अचानक जाण्याने अनेक कार्यकर्त्यांचे मनोबल खचले आहे. पण काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला मी वाऱ्यावर सोडणार नाही. दादांचा ‘जनता दरबार’ यापुढेही सुरू राहील. लोकांची कामे पूर्ण करणे हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे त्या म्हणाल्या.
शेवटी त्यांनी बारामतीकरांशी भावनिक नाते अधोरेखित करत सांगितले, “माझ्यासाठी पार्थ आणि जय हेच कुटुंब नाही; संपूर्ण बारामतीच माझा परिवार आहे. या परिवाराच्या विकासासाठी मी आयुष्यभर झटत राहीन. तुमची साथ हीच माझी शक्ती आहे.”
बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्या या भावनिक आवाहनामुळे मतदारसंघातील राजकीय वातावरण अधिकच रंगू लागले असून आगामी दिवसांत प्रचाराला वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.


