धाराशिव प्रतिनिधी
महाराष्ट्र दिनाच्या उत्सवी वातावरणात धाराशिव येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली. शासकीय मध्यवर्ती इमारतीसमोर आयोजित मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान भूविकास बँकेतील एका महिला कर्मचाऱ्याने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी एकच खळबळ उडाली असून प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
बेबी किसनराव पाटील (वय ४०) असे या महिलेचे नाव आहे. त्या भूविकास बँकेत अनुकंपा तत्त्वावर कार्यरत होत्या. बँक अवसायनात गेल्यानंतर इतर कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली असताना, पाटील यांचा मोठा सेवा कालावधी शिल्लक होता. मात्र, त्यांना थकीत वेतन आणि इतर आर्थिक लाभ मिळाले नसल्याने त्या गेल्या काही महिन्यांपासून तीव्र मानसिक तणावाखाली होत्या.
प्रशासनाकडून दाद न मिळाल्याची खंत
मिळालेल्या माहितीनुसार, पाटील यांनी आपले प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी वारंवार संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. मात्र, कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने त्या संतप्त होत्या. विशेष म्हणजे, त्यांनी आत्मदहनाचा इशारा देत कलेक्टर कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, स्थानिक पोलीस ठाणे तसेच विभागीय कार्यालयांना पूर्वसूचना दिल्याचेही समोर आले आहे.
ध्वजारोहणावेळीच टोकाचे पाऊल
महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा सुरू असतानाच पाटील यांनी अंगावर ज्वलनशील द्रव्य ओतून स्वतःला पेटवून घेतले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित अधिकारी, पोलीस आणि नागरिकांची मोठी धावपळ उडाली. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून आग विझवली आणि त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
७० टक्के भाजल्या; अतिदक्षता विभागात उपचार
रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, बेबी पाटील सुमारे ७० टक्के भाजल्या असून त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत आणि वैद्यकीय पथक त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
‘इशारे देऊनही दुर्लक्ष’ – कुटुंबीयांचा आरोप
या घटनेनंतर पाटील यांच्या बहिणी तनुजा मोहिते यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, “तिचा पगार थकलेला होता आणि त्यावरच तिचा उदरनिर्वाह चालत होता. आम्हा बहिणींवरही जबाबदारी होती. तिने २० तारखेलाच आत्मदहनाचा इशारा देत सर्व संबंधित कार्यालयांना पत्र आणि संदेश पाठवले होते. ‘आत्मदहन करणार’ असे स्पष्ट सांगूनही कोणतीच दखल घेतली गेली नाही. याआधीही तिच्यावर अन्याय झाला असून, मानसिक छळ सहन करावा लागला होता,” असा आरोप त्यांनी केला.
प्रशासनावर प्रश्नचिन्ह
घटनेनंतर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आत्मदहनाचा स्पष्ट इशारा देऊनही संबंधित यंत्रणांनी वेळीच हस्तक्षेप का केला नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


