रणजित मस्के, प्रतिनिधी
सांगली : जिल्ह्यातील घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारासह अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका फरारी आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे संजयनगर पोलीस ठाण्यातील घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून, गांजा तस्करीच्या गुन्ह्यातील मुख्य पुरवठादारालाही अटक करण्यात आली आहे.
पुण्यातील सराईत घरफोड्या जाळ्यात
संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २८ जानेवारी रोजी बंद घराचे कुलूप तोडून चोरी झाली होती. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. तपास सुरू असताना पोलीस हवालदार सागर लवटे आणि पोलीस शिपाई विक्रम खोत यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, ही घरफोडी पुण्यातील सराईत गुन्हेगार रोहन सनी लोंढे आणि यश ऊर्फ गट्टया देशमुख यांनी केली आहे.
पोलिसांनी रोहन सनी लोंढे (वय २२, रा. पिंपरी, पुणे) याला ताब्यात घेतले असता, त्याने आपल्या साथीदारासह गुन्ह्याची कबुली दिली. त्याचा साथीदार यश देशमुख हा सध्या पुणे येथील दिघी पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत आहे. या दोघांवर पुणे, सातारा आणि रायगड जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने आरोपीला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
गांजा पुरवठा करणारा मुख्य आरोपी अटकेत
दुसऱ्या एका कारवाईत, कडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९ मार्च रोजी ७ किलो गांजा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणात विजय पवार आणि अमीर मुल्ला यांना अटक करण्यात आली होती, मात्र त्यांना गांजा पुरवणारा अक्षय ज्ञानेश्वर मदने (वय २९, रा. माळशिरस, सोलापूर) हा फरार होता.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस शिपाई अभिजीत माळकर आणि संकेत कानडे यांना अक्षय मदने हा कडेगाव-विटा रोडवरील एका हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला पुढील तपासासाठी कडेगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, सहाय्यक पोलीस फौजदार अमित परिट, पोलीस हवालदार सागर लवटे, पोलीस हवालदार अनिल कोळेकर, पोलीस हवालदार नागेश खरात, पोलीस हवालदार सोमनाथ गुंडे, पोलीस हवालदार दरिबा बंडगर, पोलीस हवालदार सतिश माने, पोलीस हवालदार अमर नरळे, पोलीस हवालदार अमिरशा फकीर, पोलीस हवालदार संदीप नलावडे, पोलीस हवालदार मच्छिद्र बर्डे, पोलीस हवालदार सागर टिंगरे, पोलीस हवालदार अमोल ऐदाळे, पोलीस हवालदार संदीप पाटील, पोलीस हवालदार प्रकाश पाटील, पोलीस नाईक श्रीधर बागडी, पोलीस शिपाई विक्रम खोत, पोलीस शिपाई अभिजीत माळकर, पोलीस शिपाई संकेत कानडे आणि पोलीस शिपाई कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने केली.


