रणजित मस्के, प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील महाळुंगे एम.आय.डी.सी. परिसरात एक काळीज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. अवघ्या तीन वर्षांच्या निष्पाप बालकावर लैंगिक अत्याचार करून त्याची अत्यंत क्रूरपणे गळा चिरून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असतानाच, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी करत अवघ्या १२ तासांत अल्पवयीन आरोपीला पुणे रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, १ मे २०२६ रोजी महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका व्यक्तीचा तीन वर्षांचा मुलगा घरासमोर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला. नातेवाईकांनी आणि पोलिसांनी परिसरात शोध घेतला असता, शेजारील एका खोलीमध्ये एका बॅगेत या बालकाचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासणीत या बालकावर लैंगिक अत्याचार करून त्याची गळा चिरून हत्या केल्याचे निष्पन्न झाले. या घटनेच्या गांभीर्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांचा थरारक तपास
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले. तपासादरम्यान तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांना संशयित आरोपी हा मूळचा बिहार येथील रहिवासी असून तो स्वतः अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली.
आरोपी गुन्हा करून बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच, पोलिसांनी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेचे कलम १०३(१), २३८ आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कामगिरी
ही महत्त्वाची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉक्टर महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अप्पर पोलीस आयुक्त (प्रादेशिक) बसवराज तेली, पोलीस उप आयुक्त श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक अनिल देवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली, पोलीस उपनिरीक्षक पिंजारी, पोलीस उपनिरीक्षक जायभाये, पोलीस अंमलदार विश्वास नाणेकर, पोलीस अंमलदार किशोर सांगळे, पोलीस अंमलदार चेतन सावंत, पोलीस अंमलदार गोरख गाडीलकर, पोलीस अंमलदार शरद खैरे, पोलीस अंमलदार राजेंद्र खेडकर, पोलीस अंमलदार राजेश गिरी, पोलीस अंमलदार महेश गायकवाड, पोलीस अंमलदार राजकुमार हणमंते, पोलीस अंमलदार योगेश तिडके, पोलीस अंमलदार प्रशांत कसबे आणि पोलीस अंमलदार शिवाजी मरकड या सर्वांनी या कारवाईत सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल देवडे हे करत आहेत.


