रणजित मस्के, प्रतिनिधी
कल्याण शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर बाजारपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार सराईत आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे २ लाख ८० हजार रुपये किमतीच्या ७ दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे वाहनचोरांचे धाबे दणाणले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, २८ एप्रिल २०२६ रोजी बाजारपेठ पोलिसांना एका गुप्त बातमीदारामार्फत दुचाकी चोरीबाबत महत्त्वाची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कल्याण पश्चिम परिसरात सापळा रचून समर्थ नरसू पाटील (वय १९) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या इतर तीन साथीदारांच्या मदतीने कल्याणमधील विविध भागांतून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने हालचाली करत हर्ष रमेश परदेशी, प्रणित दिनेश शिरपे आणि रंजनाथ उर्फ सागर सुखदेव ढवळे या तिघांनाही अटक केली.
सात गुन्हे उघडकीस
आरोपींच्या चौकशीतून बाजारपेठ, महात्मा फुले आणि खडकपाडा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण ७ गुन्हे उघडकीस आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये होंडा, टीव्हीएस आणि सुझुकी अशा नामांकित कंपन्यांच्या दुचाकींचा समावेश आहे. या आरोपींनी गेल्या एक महिन्यापासून शहरात धुमाकूळ घातला होता.
यांनी केली कारवाई
ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गोड, पोलीस निरीक्षक मुकुंद डुकळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे, पोलीस हवालदार पाटील, पोलीस हवालदार भालेराव, पोलीस हवालदार बी. आर. बागूल, पोलीस हवालदार पी. एम. बाविस्कर, पोलीस शिपाई ए. बी. आंधळे आणि पोलीस शिपाई आर. ए. इशे यांनी केली आहे.
अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून, या टोळीने अजून किती ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.


