मुंबई प्रतिनिधी
मुंबई उपनगर जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघांतील प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत वांद्रे (पूर्व) मतदारसंघातील वाहतूक, पायाभूत सुविधा आणि रस्ते विकासाशी संबंधित मुद्दे प्राधान्याने चर्चिले गेले. स्थानिक आमदार वरुण सरदेसाई यांनी या भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींचा सविस्तर आढावा मांडत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
ज्ञानेश्वर नगर ते बीकेसी मेट्रो स्थानकादरम्यानचा रस्ता नव्याने विकसित करून वाहतुकीसाठी खुला करण्याचा मुद्दा बैठकीत ठळकपणे मांडण्यात आला. या मार्गामुळे स्थानिक रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार असून बीकेसी परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
तसेच, वांद्रे (पूर्व) रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ‘स्टेशन एरिया ट्रॅफिक इम्प्रूव्हमेंट स्कीम’ (SATIS) प्रकल्प राबवण्याचा प्रस्ताव पुढे आला. या प्रकल्पामुळे पादचारी व वाहनचालकांसाठी सुसूत्रता निर्माण होऊन परिसरातील गोंधळ कमी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या सर्व्हिस रोडवर होत असलेल्या दुहेरी पार्किंगमुळे निर्माण होणाऱ्या अडथळ्यांवरही बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. हे अडथळे तातडीने दूर करून वाहतुकीला मोकळीक देण्याचे निर्देश देण्यात आले.
याशिवाय, टी.पी.एस. रोड क्रमांक ११ ते गोलिबार नाका, सांताक्रूज (पूर्व) या मार्गावरील विकास आराखड्यातील (DP) रस्ता लवकरात लवकर विकसित करण्याची मागणी करण्यात आली. या रस्त्याच्या विकासामुळे परिसरातील अंतर्गत वाहतूक अधिक सुलभ होणार आहे.
या सर्व मुद्द्यांवर संबंधित विभागांनी समन्वय साधून तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री शेलार यांनी दिल्याचे समजते. बैठकीत प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


