मुंबई प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अखेर पूर्णत्वास जात असून १ मेपासून तो वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. खंडाळा घाटातील वळणावळणांचा मार्ग टाळून अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुकर प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या या प्रकल्पामुळे लाखो वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.
खोपोली आणि कुसगाव दरम्यान उभारण्यात आलेला हा सुमारे १३.३ किलोमीटर लांबीचा मार्ग थेट जोडणी देत असल्याने लोणावळा–खंडाळा घाटातील वाहतूक टाळणे शक्य होणार आहे. परिणामी प्रवासाचे एकूण अंतर सुमारे सहा किलोमीटरने कमी होणार असून विशेषतः आठवड्याच्या शेवटी आणि सुट्ट्यांच्या काळात होणारी कोंडी कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात केवळ हलकी मोटार वाहने, कार, एसयूव्ही तसेच प्रवासी बस, यांनाच या मार्गावर प्रवेश दिला जाणार आहे. अवजड वाहने, ट्रक आणि कंटेनरना सध्या बंदी घालण्यात आली असून पुढील काही महिन्यांत वाहतूक परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने वेगमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. कार आणि हलक्या वाहनांसाठी कमाल वेगमर्यादा ताशी १०० किलोमीटर, तर बससाठी ताशी ८० किलोमीटर ठेवण्यात आली आहे. विशेषतः बोगद्यांमध्ये वेगावर काटेकोर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा, वेग मोजणारी उपकरणे आणि नियंत्रण प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सध्या दररोज सुमारे ७५ हजार वाहने धावत असून, शनिवार-रविवार आणि सुट्ट्यांच्या दिवशी हा आकडा १.२ लाखांपर्यंत पोहोचतो. अशा परिस्थितीत ‘मिसिंग लिंक’मुळे वाहतूक सुरळीत होण्याबरोबरच प्रवासाचा वेळ कमी होईल, घाटातील अपघातांचे प्रमाण घटेल आणि इंधनाची बचत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या प्रकल्पामुळे मुंबई–पुणे प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि आरामदायी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


