मुंबई प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेच्या उमेदवारीची उत्सुकता अखेर संपुष्टात आली असून, पक्षाने झिशान सिद्धीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत उशिरापर्यंत सुरू असलेल्या चर्चेनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. अनेक इच्छुकांच्या शर्यतीत सिद्धीकी सुरुवातीपासून आघाडीवर असल्याची चर्चा होती; त्यावर आज अधिकृत शिक्कामोर्तब झाले.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सिद्धीकी यांनी पहिल्याच प्रतिक्रियेत पक्षाच्या युवकवर्गाशी संवाद वाढवण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले. “माझ्यासारख्या युवकाला संधी देऊन पक्षाने विश्वास दाखवला आहे. अधिकाधिक युवक राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडले जावेत यासाठी मी काम करेन,” असे त्यांनी सांगितले. अल्पसंख्याकांच्या प्रश्नांवर ठामपणे भूमिका मांडण्याचाही त्यांनी निर्धार व्यक्त केला.
सिद्धीकी यांनी या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांचे विशेष आभार मानले. “पक्षातील वरिष्ठांनी मला मुलासारखी संधी दिली. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करेन,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख करत, “त्यांचा आशीर्वाद कायम माझ्यासोबत आहे,” असेही सांगितले. कुटुंबीय, कार्यकर्ते आणि समर्थकांचेही त्यांनी आभार मानले.
दरम्यान, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सिद्धीकी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले असून, आगामी काळात युवकांना केंद्रस्थानी ठेवून संघटन विस्ताराला गती देण्याचे संकेत त्यांच्या विधानातून मिळत आहेत.


