मुंबई प्रतिनिधी
मानखुर्द परिसरात घडलेल्या क्रेन दुर्घटनेनंतर पूर्व उपनगरांतील वाहतूक व्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडाल्याचे बुधवारी प्रकर्षाने दिसून आले. अवघ्या १२ ते १५ मिनिटांत पार होणारे चेंबूर-मानखुर्द अंतर वाहनचालकांना तब्बल पाच ते सहा तासांत कापावे लागले. परिणामी, हजारो नागरिक तासनतास रस्त्यावर अडकून पडले आणि नियोजनाच्या अभावामुळे प्रशासनावर तीव्र टीका करण्यात आली.
मंगळवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास सुरू असलेल्या खोदकामादरम्यान रस्त्याच्या मधोमध उभी असलेली क्रेन कोसळली. या अपघातात एका पोलिसाचा मृत्यू झाला. मात्र, अपघातानंतर तत्काळ यंत्रणा सक्रिय होऊन क्रेन बाजूला करण्याची अपेक्षा असताना प्रत्यक्षात बुधवारी दुपारपर्यंत कोणतीही ठोस हालचाल झाली नाही. त्यामुळे आधीच सुरू असलेल्या उड्डाणपुलांच्या कामांमुळे अरुंद झालेल्या रस्त्यांवर वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली.
क्रेन हटवण्यासाठी आणखी एक अवजड क्रेन रस्त्याच्या मधोमध उभी केल्याने मुंबईहून नवी मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. पर्यायी मार्गांविषयी स्पष्ट सूचना नसल्याने वाहनचालक गोंधळले. अनेक ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांचा अभाव जाणवत होता, तर काही ठिकाणी स्थानिक नागरिकच वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसून आले.
पाणी, स्वच्छतागृहांचा अभाव; प्रवाशांची परवड
कोंडीत अडकलेल्या प्रवाशांची परिस्थिती अत्यंत बिकट होती. अनेकांच्या वाहनांमध्ये पिण्याचे पाणी नव्हते. मधुमेह किंवा इतर आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांना स्वच्छतागृहांच्या अभावामुळे मोठा त्रास सहन करावा लागला. मागे वळण्याचाही पर्याय नसल्याने नागरिक अक्षरशः कोंडीत कैद झाले होते. काहींनी २६ जुलैच्या महापुराची आठवण करून देत या परिस्थितीची तुलना ‘त्याहूनही भयावह’ अशी केली.
२४ तासांची कोंडी; पर्यायी मार्गांची माहिती नाही
मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडलेल्या दुर्घटनेनंतर तब्बल २४ तास उलटूनही वाहतूक पूर्णतः सुरळीत झालेली नव्हती. या काळात पर्यायी मार्ग म्हणून उपलब्ध असलेल्या अटल सेतूविषयी कोणतीही स्पष्ट माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. त्यामुळे अनेक वाहनचालक ना अटल सेतूकडे वळू शकले, ना वेळेत नवी मुंबई गाठू शकले.
प्रवासी वाहतुकीलाही फटका
मुंबईहून पुणे, सातारा, सांगली तसेच बेंगळुरूकडे जाणाऱ्या खासगी प्रवासी वाहतुकीवरही या कोंडीचा मोठा परिणाम झाला. संध्याकाळी सुटणाऱ्या अनेक ट्रॅव्हल्स गाड्या वेळेवर निघू शकल्या नाहीत. परिणामी, लांब पल्ल्याच्या प्रवाशांनाही विलंबाचा फटका बसला.
चार तासांत वरळी ते नवी मुंबई
सायंकाळी सहा वाजता वरळीहून नवी मुंबईकडे निघालेल्या काही नागरिकांना रात्री अकरा वाजेपर्यंत गंतव्यस्थानी पोहोचता आले नाही. योग्य मार्गदर्शनाचा अभाव आणि वाहतूक नियंत्रणातील त्रुटी यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.
मानखुर्द परिसरातील सुरू असलेली पायाभूत कामे, त्यात झालेली दुर्घटना आणि त्यानंतरचे नियोजनशून्य व्यवस्थापन यामुळे महामुंबईतील वाहतूक व्यवस्थेतील उणिवा पुन्हा एकदा उघड झाल्या आहेत. अशा घटनांनंतर तात्काळ प्रतिसाद, पर्यायी मार्गांची स्पष्ट माहिती आणि समन्वयित यंत्रणा उभी करण्याची गरज अधिक तीव्रतेने समोर आली आहे.


