मुंबई प्रतिनिधी
राज्यातील विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, महाविकास आघाडीतील एक महत्त्वाचा तिढा अखेर सुटल्याचे चित्र बुधवारी दिसून आले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः निवडणूक न लढवण्याचा निर्णय कायम ठेवत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या निर्णयामुळे आघाडीत सुरू असलेल्या ‘हायव्होल्टेज’ चर्चांना तात्पुरता विराम मिळाला आहे.
विधान परिषदेच्या या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वाट्याला आलेल्या जागेवर ठाकरे यांनीच उमेदवारी करावी, असा आग्रह काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्याकडून सातत्याने धरला जात होता. ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे आघाडीची ताकद वाढेल, असा या मित्रपक्षांचा युक्तिवाद होता. मात्र, सुरुवातीपासूनच ठाकरे निवडणूक लढवण्याबाबत अनुत्सुक असल्याचे संकेत देत होते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत जवळ येत असताना राजकीय दबाव वाढत होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना निवडणूक लढवण्याची विनंती केली होती. त्याचवेळी, ठाकरे निवडणूक लढवणार नसतील तर संबंधित जागा काँग्रेसला देण्याची मागणीही त्यांनी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही ठाकरे यांच्या उमेदवारीला उघड पाठिंबा देण्यात आला होता. खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना ठाकरे यांनी निवडणूक लढवावी, अशी भूमिका मांडली होती.
या सर्व घडामोडींमध्ये अखेर ठाकरे यांनी स्वतः मागे राहत अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. दानवे हे विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते असून, पक्षातील लढवय्या आणि संघटनात्मक बळ असलेले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला शिवसेनेतून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, ठाकरे यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसची पुढील भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. कारण, ठाकरे उमेदवार नसल्यास काँग्रेस स्वतःचा उमेदवार देईल, अशी भूमिका यापूर्वीच मांडण्यात आली होती. त्यामुळे आता आघाडीत नव्या समीकरणांची शक्यता नाकारता येत नाही.
विधान परिषदेच्या या निवडणुकीसाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता असून, राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीत एकमताचा अभाव अधोरेखित होत असतानाच, ठाकरे यांच्या या ‘हुकमी’ निर्णयाने पुढील राजकीय समीकरणांवर नेमका काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


