मुंबई प्रतिनिधी
शहराच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या होमगार्ड जवानांनाच मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. वांद्रे रेल्वे स्थानक येथे पंखे बंद करणे, तसेच काही प्रमुख स्थानकांवर पिण्याच्या पाण्यावरही निर्बंध घालण्यात आल्याच्या तक्रारींमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
मुंबईतील उपनगरी रेल्वे स्थानकांवर ड्युटी करणाऱ्या होमगार्ड जवानांची स्थिती हलाखीची असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. विशेषतः रात्री शेवटची लोकल गेल्यानंतर काही तास विश्रांतीसाठी प्लॅटफॉर्मवर थांबणाऱ्या जवानांना मूलभूत सोयी नाकारल्या जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
वांद्रे स्थानकातील प्रकार
शनिवारी मध्यरात्रीनंतर शेवटची लोकल सुटल्यानंतर काही होमगार्ड जवान वांद्रे रेल्वे स्थानक येथे विश्रांतीसाठी तिकीट काऊंटर परिसरात गेले. मात्र, तेथे पोहोचताच पंखे बंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर ही बाब अधिकच गंभीर ठरते.
जवानांनी याबाबत चौकशी केली असता त्यांना विद्युत विभागाशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले. मात्र, तिथेही कोणतीही मदत मिळाली नसल्याची तक्रार आहे. परिणामी, उकाड्यात रात्र काढण्याची वेळ त्यांच्यावर आली.
पाण्यावरही निर्बंध?
यापूर्वीच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चर्चगेट रेल्वे स्थानक येथे मोटरमनच्या केबिनमधून थंड पाणी घेण्यास होमगार्डना मनाई केल्याचा आरोप करण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बाब गंभीर मानली जात आहे.
वादाची पार्श्वभूमी
या सर्व प्रकारामागे २१ एप्रिल रोजी विलेपार्ले रेल्वे स्थानक येथे घडलेल्या वादाची पार्श्वभूमी असल्याचे सांगितले जाते. होमगार्ड आणि मोटरमन यांच्यात झालेल्या वादात होमगार्ड मनोज सावंत यांनी मोटरमनला लाथ मारल्याचा आरोप आहे. या घटनेची नोंद ‘एनसी’ स्वरूपात करण्यात आली असली, तरी संबंधितावर कडक कारवाईची मागणी होत आहे.
या घटनेनंतर सर्वच होमगार्डना लक्ष्य केले जात असल्याची भावना जवानांमध्ये निर्माण झाली आहे.
अस्थिर रोजगार, वाढती असुरक्षितता
मुंबईत सुमारे चार ते पाच हजार होमगार्ड नोंदणीकृत असले तरी प्रत्यक्षात केवळ दीड ते दोन हजारच कार्यरत असल्याचे सांगितले जाते. त्यातही ‘एक महिना काम, दोन महिने विश्रांती’ अशा अस्थिर कामाच्या पद्धतीमुळे त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
प्रश्न उपस्थित केल्यास कामावरून कमी करण्याची भीती असल्याने अनेक जवान उघडपणे बोलण्यास टाळाटाळ करत असल्याचेही समोर आले आहे.
प्रशासनाची भूमिका
या संदर्भात पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिशेष यांनी सांगितले की, “होमगार्डची अडवणूक करणे शक्य नाही. कोणी जाणूनबुजून अडथळे निर्माण करत असल्यास त्याची चौकशी केली जाईल. कुणाचीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.”
प्रश्न अद्याप अनुत्तरित
दरम्यान, शहराच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या जवानांनाच मूलभूत सुविधा नाकारल्या जात असल्याचे चित्र चिंताजनक आहे. रेल्वे प्रशासन आणि संबंधित विभाग यांच्यातील समन्वयाचा अभाव की एखाद्या घटनेचा परिणाम, या प्रश्नांची उत्तरे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.
उष्णतेच्या लाटेत काम करणाऱ्या होमगार्ड जवानांना किमान पाणी, वीज आणि विश्रांतीच्या सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याची भावना व्यक्त होत आहे.


