मुंबई प्रतिनिधी
राज्यातील दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग, नाशिक अंतर्गत राज्यभरातील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये ‘चौकीदार (गट-ड)’ पदासाठी ४१६ रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. दुर्गम व आदिवासी भागातील शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही भरती महत्त्वाची मानली जात आहे.
या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास २७ एप्रिलपासून सुरुवात झाली असून इच्छुक उमेदवारांनी १८ मे रोजी रात्री ११.५५ वाजेपर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज व शुल्क भरण्यासाठी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे बंधनकारक आहे.
शैक्षणिक अट व पात्रता
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेची गणना २७ एप्रिल २०२६ या जाहिरातीच्या दिनांकापर्यंत करण्यात येणार असल्याने, यापूर्वी निकाल जाहीर झालेल्या उमेदवारांनाच या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा (CBT) द्वारे केली जाणार आहे. ही परीक्षा २०० गुणांची असून तिचा कालावधी १२० मिनिटांचा असेल. परीक्षा पूर्णतः मराठी माध्यमात होणार असून पात्रतेसाठी किमान ४५ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.
शुल्क व अर्ज प्रक्रिया
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क १००० रुपये निश्चित करण्यात आले आहे, तर मागासवर्गीय, ओबीसी, अनाथ व दिव्यांग उमेदवारांसाठी ९०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. अर्ज व शुल्क भरण्याची अंतिम मुदत १८ मे हीच आहे.
वेतनश्रेणी
निवड झालेल्या उमेदवारांना १५,००० ते ४७,६०० रुपये दरम्यान वेतन दिले जाणार असल्याचे अधिकृत जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे.
अधिवासाची अट
अर्जदार हा भारताचा नागरिक आणि महाराष्ट्राचा अधिवासी असणे आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील ८६५ मराठी भाषिक गावांतील उमेदवारांनाही संधी देण्यात आली असून, त्यांच्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला अधिवास दाखला असणे गरजेचे आहे.
दरम्यान, दुर्गम भागातील शैक्षणिक संस्थांची सुरक्षा बळकट करण्याच्या दृष्टीने ही भरती महत्त्वाची ठरणार असून, पात्र उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.


