मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील पायधुनी परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. संशयित विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये दोन अल्पवयीन मुलींचाही समावेश असल्याने या घटनेने अधिकच शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायधुनीतील घाटी गल्ली येथील मुघल बिल्डिंगमध्ये राहणारे डोकाडिया कुटुंब शनिवारी रात्री नातेवाईकांसोबत जेवणासाठी एकत्र आले होते. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सर्वांनी एकत्रितपणे जेवण केले. जेवणात बिर्याणी खाल्ल्यानंतर कुटुंबीयांनी कलिंगडही खाल्ले होते.
मात्र, दुसऱ्याच दिवशी सकाळपासून कुटुंबातील सदस्यांना उलट्या, जुलाब, चक्कर येणे आणि तीव्र पोटदुखी अशी लक्षणे जाणवू लागली. प्रकृती बिघडल्याने त्यांनी प्रथम स्थानिक फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेतला. डॉक्टरांनी परिस्थितीची गंभीरता ओळखून त्यांना तातडीने जेजे रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.
दरम्यान, रविवारी कुटुंबीयांची प्रकृती अधिकच खालावत गेली. डोकाडिया दांपत्याच्या दोन्ही मुली घरात बेशुद्ध अवस्थेत आढळल्या. त्यानंतर चौघांनाही तातडीने जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच एका मुलीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. काही तासांच्या अंतराने दुसऱ्या मुलीचाही मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर काही वेळातच आई-वडिलांचाही मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंब एकाचवेळी काळाच्या पडद्याआड गेले.
मृतांची ओळख अब्दुल्ला डोकाडिया (वय ४०), नसरीन डोकाडिया (वय ३५) आणि त्यांच्या मुली आयशा (१६) व झैनब (१३) अशी करण्यात आली आहे.
या घटनेपूर्वी कुटुंबातील एका सदस्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात, “आम्ही सर्वांनी आधी बिर्याणी खाल्ली आणि त्यानंतर कलिंगड खाल्ले,” अशी माहिती दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, अन्नपदार्थांमुळे विषबाधा झाली की इतर काही कारण आहे, याबाबत विविध शक्यता तपासल्या जात आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे पायधुनी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, एकाच कुटुंबाचा झालेला असा दुर्दैवी अंत नागरिकांना हादरवून गेला आहे.


