मुंबई प्रतिनिधी
समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मानवतेच्या मूलभूत मूल्यांना जागतिक स्तरावर नवे बळ देणारी ऐतिहासिक घडामोड जर्मनीत घडणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पताका प्रथमच युरोपच्या भूमीवर संघटित स्वरूपात उंचावली जाणार असून, २ मे २०२६ रोजी या चळवळीची औपचारिक सुरुवात होणार आहे.
महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जर्मनीत स्थायिक असलेल्या “आंबेडकराइट्स इंटरकल्चरल मिशन” या नोंदणीकृत संस्थेच्या पुढाकाराने, तसेच युरोपभरातील विविध आंबेडकरी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा मैन्झ-कास्टेल येथील ब्युर्गरहाउस कास्टेल येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत पार पडणार आहे.
या उपक्रमाचे नेतृत्व रितेश कडबे करत असून, नितेश गायकवाड, रुपेश जाधव, सुभाष चव्हाण आणि रवी जीलते यांचे त्यांना सक्रिय सहकार्य लाभत आहे. सामाजिक न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांची जाणीव जागतिक पातळीवर दृढ करणे आणि आंबेडकरी विचारसरणीला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला फ्रँकफर्ट येथील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या कॉन्सुलर जनरल सुश्री शुचिता किशोर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरणे, भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानाचे पठण, तसेच विविध मान्यवरांचे प्रेरणादायी विचार मांडले जाणार आहेत. सुमारे २०० हून अधिक नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडण्याची अपेक्षा आहे.
आंबेडकराइट्स इंटरकल्चरल मिशन ही संस्था परदेशात वास्तव्यास असलेल्या आंबेडकरी विद्यार्थी व कुटुंबांसाठी आधारव्यवस्था उभारण्याचे कार्य करत असून, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्तरावर मार्गदर्शन देत आहे. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ जयंती उत्सव न राहता सामाजिक परिवर्तनाच्या व्यापक चळवळीची सुरुवात ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
युरोपमधील विविध संघटनांच्या सहकार्याने उभा राहणारा हा उपक्रम भारतीय प्रवासी समाजात संविधानिक मूल्यांचे संवर्धन, सामाजिक समतेचा प्रसार आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जर्मनीतून सुरू होणारी ही चळवळ आगामी काळात संपूर्ण युरोपभर विस्तारेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत असून, आंबेडकरी विचारांच्या जागतिक प्रसारासाठी हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.


