सातारा प्रतिनिधी
राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि सहयोगी पक्षांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छुकांकडून पक्षश्रेष्ठींकडे जोरदार लॉबिंग सुरू आहे. जागावाटपाच्या प्राथमिक चित्रानुसार भाजपच्या वाट्याला सर्वाधिक जागा जाण्याची शक्यता असल्याने त्या पक्षात स्पर्धा चुरशीची आहे. मात्र, शिवसेनेच्या दोन जागांपैकी एका जागेवर नाव जवळपास निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, सातारा जिल्ह्यातील अलीकडील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता बळावत आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत घडलेल्या नाट्यमय घडामोडी, तसेच आमदार महेश शिंदे यांच्या भूमिकेमुळे स्थानिक समीकरणांमध्ये बदल झाला आहे.
जागावाटपाचे गणित
विधान परिषदेच्या एकूण नऊ जागांपैकी पाच जागा भाजपला, दोन जागा शिवसेनेला, तर प्रत्येकी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेली जागाही भाजपकडेच राहणार असल्याने भाजपची ताकद सहा जागांपर्यंत जाऊ शकते.
साताऱ्याला संधी?
शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या दोन जागांपैकी एक जागा साताऱ्याला दिली जाऊ शकते, अशी जोरदार चर्चा आहे. फलटणच्या ‘धाकट्या राजें’ म्हणून ओळख असलेल्या संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषविले असून स्थानिक पातळीवर त्यांचा प्रभाव मानला जातो.
दरम्यान, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनीही आपल्या गटासह शिवसेनेत प्रवेश केल्याने ‘राजे’ गटाचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने या गटाला बळ देण्याच्या दृष्टीने पक्ष नेतृत्व सकारात्मक असल्याचे संकेत मिळत आहेत.
अंतर्गत मतभेदांचा परिणाम?
साताऱ्यातील शिवसेनेच्या राजकारणात अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले आहेत. आमदार महेश शिंदे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय, तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी निर्माण झालेला तणाव, या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत समीकरणे बदलत असल्याचे दिसून येते.
अलीकडेच झालेल्या सातारा दौऱ्यात एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमांपासून महेश शिंदे दूर राहिल्याने या दरीत आणखी वाढ झाल्याचे मानले जाते. त्यामुळे पक्षवाढीच्या दृष्टीने नवे चेहरे पुढे करण्याचा पर्याय नेतृत्वाकडून स्वीकारला जाऊ शकतो.
सर्वसामान्यांना संधीचा पॅटर्न?
राज्यसभा निवडणुकीच्या वेळी एकनाथ शिंदे यांनी पारंपरिक राजकीय घराण्यांऐवजी सर्वसामान्य पार्श्वभूमीतील ज्योती वाघमारे यांना संधी देत धक्का दिला होता. त्यामुळे यावेळीही ते पारंपरिक समीकरणांपासून वेगळा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अंतिम निर्णयाकडे लक्ष
शिवसेनेच्या दोन जागांपैकी एक नाव निश्चित झाल्याची चर्चा असली, तरी अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. साताऱ्यातील बदलते राजकारण, ‘राजे’ गटाची ताकद आणि पक्षांतर्गत मतभेद या सर्वांचा विचार करून अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे मानले जाते. त्यामुळे विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून नेमकी कोणाला संधी मिळते, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


