नागपूर प्रतिनिधी
राज्यात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात असला, तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत सरकारच अंधश्रद्धेला अप्रत्यक्ष पाठबळ देत असल्याची टीका अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी केली. “सत्ताधारीच अंधश्रद्धा पसरवणाऱ्या बाबांना गावोगावी फिरवत असतील, तर ‘खरात’सारख्या घटनांना कोण जबाबदार?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
शुक्रवारी सीताबर्डी येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलन सभागृहात आयोजित जाहीर व्याख्यानात ते बोलत होते. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने ‘बुवा तेथे बाया : महिलांची फसवणूक का होते?’ या विषयावर हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार होते. माजी आमदार अशोक धवड, जनमंचचे सल्लागार शरद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. मानव यांनी आपल्या भाषणात अंधश्रद्धेच्या सामाजिक आणि सांस्कृतिक मुळांवर भाष्य करत, सुंदरदास महाराजांपासून आसाराम, राम रहीम, नित्यानंद यांसारख्या वादग्रस्त बाबांपर्यंतचा उल्लेख केला. “दैवी शक्ती, मोक्ष, संकटातून मुक्ती अशा आमिषांद्वारे किंवा भीती दाखवून महिलांचे शोषण केले जाते. यात महिलांचा दोष नसून समाजाने दिलेल्या संस्कारांची जबाबदारी अधिक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
“लहानपणापासून महिलांना प्रश्न विचारू नका, गुरूवर अंधश्रद्धा ठेवा, त्यांचा शब्द अंतिम मानावा, असे शिकवले जाते. याच मानसिकतेचा गैरफायदा भोंदू बाबा घेतात,” असे ते म्हणाले. त्यांनी विशेषतः ‘खरात’सारख्या प्रकरणांचा उल्लेख करत, “अशा घटनांमधून धडा घेत सरकारने तातडीने कठोर पावले उचलली पाहिजेत, अन्यथा अशा बाबांची पुनरावृत्ती थांबणार नाही,” असा इशाराही दिला.
यावेळी विजय वडेट्टीवार यांनीही भोंदू बाबांविरोधात तीव्र भूमिका मांडत, “अशा प्रवृत्तींना कठोर शिक्षा झाली पाहिजे,” असे सांगितले. शरद पाटील यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी समाजाने एकत्र येण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश झुरमुरे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रशांत सपाटे यांनी केले.
अंधश्रद्धेविरोधातील कायद्याची अंमलबजावणी आणि सामाजिक जागृती यांचा अभाव कायम राहिल्यास ‘खरात’सारख्या घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त करत प्रा. मानव यांनी शासनाला ठोस कृती करण्याचे आवाहन केले.


