नागपूर प्रतिनिधी
विदर्भातील उष्णतेचा कडाका दिवसेंदिवस वाढत असताना जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी, १८ एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केले आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार नागपूर जिल्ह्यात ‘हीट वेव्ह’ची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून १८ एप्रिलसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मार्चपासूनच तापमानात सातत्याने वाढ होत असून पारा ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. दुपारच्या सत्रात उन्हाची तीव्रता अधिक वाढत असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच कष्टकरी वर्गासाठी ही परिस्थिती धोकादायक ठरू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर अंगणवाडीपासून महाविद्यालयांपर्यंत सर्व शैक्षणिक संस्था, तसेच खासगी कोचिंग क्लासेसना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुढील काही दिवस हवामानाचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार पुढील निर्णय घेतले जातील, असेही प्रशासनाने नमूद केले आहे.
दरम्यान, उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्ह्यात ‘हीट ॲक्शन प्लॅन’ कार्यान्वित करण्यात आला आहे. त्याअंतर्गत ५६ शीतकक्षांची व्यवस्था करण्यात आली असून उपजिल्हा रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उष्माघातग्रस्त रुग्णांसाठी एसी, उच्च क्षमतेचे कूलर्स, बर्फ, तसेच थंड पाण्याने स्पंजिंगची सुविधा उपलब्ध ठेवण्यात आली आहे.
आरोग्य विभागाने उष्माघातावरील औषधसाठा सज्ज ठेवला असून प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर तत्पर प्रतिसाद देण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. शिक्षण, महिला व बालकल्याण विभागांनाही आवश्यक सूचना देण्यात आल्या असून शाळांमध्ये सकाळीच वर्ग घेणे, विद्यार्थ्यांना नियमित पाणी पिण्यास प्रोत्साहन देणे, तसेच ‘वॉटर बेल’ प्रणाली राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ग्रामीण भागात ग्रामपंचायतींच्या माध्यमातून दवंडी देऊन नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी शेतीची कामे सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच बसस्थानके, रेल्वे स्थानके आणि सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.
नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी पुरेसे पाणी पिणे, सैल व हलक्या रंगाचे कपडे वापरणे, तसेच लहान मुले आणि ज्येष्ठांची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने अधोरेखित केले आहे.


